शेअर बाजारात मोठी पडझड..!

Aug 5, 2024 - 10:43
 0
शेअर बाजारात मोठी पडझड..!

मुंबई : जागतिक पातळीवर सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. आखाती प्रदेश तसेच अमेरिकेतील पडसादांचा फटका भारतीय भांडवली बाजाराला बसला आहे. सध्या इस्रायल आणि इराण यांच्यातील तणावामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजाराचे दोन्ही निर्देशांक चांगलेच गडगडले.

परिणामी गुंतवणूकदारांचे एका झटक्यात कोट्यवधी रुपये बुडाले आहेत.

बाजार खुला होताच मोठी पडझड!

आज भांडवली बाजाराच्या नव्या आठवड्याचा पहिलाच दिवस होता. मात्र या पहिल्याच दिवशी राष्ट्रीय शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक निफ्टी 50 हा बाजार खुला होताच 393 अंकांनी घसरला. तर दुसरीकडे मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स 1298 अंकांच्या घसरणीसह खुला झाला. म्हणजेच बीएसई आणि एनएसईत बाजार चालू होताच मोठी घसरण झाली.

शेअर बाजाराची सध्याची स्थिती काय आहे?

गेल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 80,981.95 अंकांवर बंद झाला होता. पण आता चालू आठवड्याच्या पहिल्याच दिवशी एनएसईत मोठी पडझड झाली. बीएसई निर्देशांक 1298 अंकांच्या घसरणीसह चालू झाला. ही घसरण आणखी वाढली असून सध्या ही पडझड 1,510.22 अंकांपर्यंत वाढली आहे. मुंबई शेअर बाजारातील ही घसरण साधरण 1.9 टक्के आहे.

राष्ट्रीय शेअर बाजाराच्याही गटांगळ्या

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी या निर्देशांकाचीही असीच स्थिती आहे. निफ्टी निर्देशांक 393 अंकांच्या घसरणीसह खुला झाला. गेल्या आठवड्यात शुक्रवारी 24,717.70 अंकांवर बंद झाला होता. तर आज (5 ऑगस्ट) निफ्टी निर्देशांक 24,302.85 अंकांनी खुला झाला. सध्या ही पडझड 436.50 अंकांपर्यंत वाढली असून पडझडीचे हे प्रमाण 1.77 टक्के आहे.

शेअर बाजारातील पडझडीचे नेमके कारण काय?

भारतीय शेअर बाजाराच्या पडझडीला अनेक घटना कारणीभूत ठरल्या आहेत. यात सर्वांत महत्त्वाची घटना म्हणजे इस्रायल आणि इराण यांच्यातील तणावाची स्थिती ही आहे. या दोन्ही देशांतील तणाव सध्या वाढला आहे. याच कारणामुळे अमेरिका आणि इंग्लंडने आपल्या नागरिकांना लेबनॉन सोडण्याची सूचना दिली आहे. दुसरीकडे अमेरिकेतील बेरोजगारीने डोकं वार काढलंय. अमेरिकेतील महागाईदेखील वाढल्याचं चित्र दिसतंय. अमेरिकन शेअर बाजारात शुक्रवार मोठी पडझड झाली होती. त्यामुळे त्याचाच परिणाम आता भारतीय शेअर बाजारावर झाला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:12 05-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow