खेड : लोटे एमआयडीसीच्या सांडपाणी पाईपलाईनमध्ये दगड, कचरा

Aug 26, 2024 - 11:59
 0
खेड :  लोटे एमआयडीसीच्या सांडपाणी पाईपलाईनमध्ये दगड, कचरा

लोटे : तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमधील रासायनिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पापर्यंत वाहून नेणाऱ्या पाईपलाईन आणि चेंबर मध्ये दगड, चप्पल, बूट, कचरा, बाटल्या इत्यादी टाकल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत पोलीस प्रशासनाकडे रीतसर तक्रार केली असून याचा तपास करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी केली असल्याचेही उद्योजक संघटनेचे अध्यक्ष अॅड. राज आंब्रे यांनी सांगितले.

लोटे औद्योगिक वसाहतीमधील रासायनिक कारखाने कायमच प्रदूषण, अपघात यासाठी चर्चेत असतात. पावसाळ्याच्या दिवसात परिसरातील नदी नाल्यांमध्ये रासायनिक घातक सांडपाणी वाहत असल्याचे अनेक वेळा आढळते. अशावेळी पंचक्रोशीतील नागरिकांमधून कारखानदारांविरोधात संताप व्यक्त केला जातो. मात्र, या पलीकडची दुसरी बाजू उद्योजक संघटनेने समोर आणली असून, गेल्या काही दिवसांपासून सततच्या घडणाऱ्या प्रकारांमुळे उद्योजक संघटनेने एमआयडीसीकडे या पाईपलाईनची तपासणी करून खरे कारण शोधण्याची विनंती केली. या विनंतीवरून एमआयडीसीने जिथे जिथे चेंबर ओव्हरफ्लो होत आहेत, तेथे पाईपलाईनची खोदाई करून व पाईप कापून पाईपलाईन चेकअप का झाली आहे? हे पाहिले असता धक्कादायक प्रकार उघड झाला. सांडपाण्याच्या पाईपलाईनमध्ये अक्षरशः सिमेंटच्या गोण्यांमध्ये भरून दगड, कचरा, चप्पल, बूट, बाटल्या इत्यादी वस्तू सापडल्या. या भरलेल्या गोणीमुळे पाईपलाईन मधील प्रवाह पूर्णतः बंद झाला होता. परिणामी रासायनिक सांडपाणी सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पापर्यंत न पोहोचता पाठीमागील चेंबर वरती ओव्हर फ्लो होत होते आणि ते घातक रासायनिक सांडपाणी नदी नद्यांमध्ये मिसळत होते, असे स्पष्ट झाले. हे कृत्य कोण्या अज्ञात समाजकंटकाने रासायनिक 1 कारखान्यांना हेतू पुरस्सर बदनाम करण्याच्या उद्देशाने केले असावे, असा आरोप लोटे परशुराम उद्योजक संघटनेचे अध्यक्ष अॅड. राज आंब्रे, राजेश तिवारी, शिरीष चौधरी, मिलिद बारटक्के, रवींद्र कदम यांनी केला आहे.

सीसीटीव्ही बसवण्याची मागणी
असे प्रकार वारंवार घडू नयेत यासाठी आम्ही एमआयडीसीकडे चेम्बर्सच्या झाकणांना लॉक सिस्टिम आणि सीसीटीव्ही बसवण्याची मागणी करणार आहोत. तसेच झालेल्या प्रकाराबाबत आम्ही रीतसर पोलीस प्रशासनाकडे तक्रार दाखल केली असून या समाजकंटकाला शोधून काढून त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे असेही सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:26 PM 26/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow