रत्नागिरी कॅलिफोर्नियापेक्षाही सुंदर : ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर

Sep 2, 2024 - 09:20
 0
रत्नागिरी कॅलिफोर्नियापेक्षाही सुंदर : ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर

रत्नागिरी : रत्नागिरी हे कॅलिफोर्नियापेक्षाही सुंदर आहे. रत्नागिरीतील लोकांमध्ये मनाची श्रीमंती, अध्यात्मिकता यासारखे चांगले गुण दिसून येतात. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी शिक्षणाच्या सर्वांगीण विकासासाठी जे कार्य केले आहे, ते अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्या समाजावर ज्ञानाचा पगडा आहे. समाजात ज्ञानेश्वर हवेत पण त्याबरोबर विज्ञानेश्वर पण हवे आहेत, असे ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांनी सांगितले. ते उदय पर्व या कार्य अहवाल प्रकाशन सोहळ्या प्रसंगी बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर, ज्येष्ठ समाजसेवक डॉ. विकास आमटे, पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह इतर मान्यवर मंडळी उपस्थित होते. माशेलकर म्हणाले, आपण लक्ष्मी आणि सरस्वती त्यांची वेगवेगळी पूजा करतो. मात्र सरस्वतीकडूनच आपण लक्ष्मीकडे जातो. शिक्षण घेऊनच आपण धन कमवतो. म्हणजेच ज्ञानातून अर्थार्जनाकडे जातो. स्टार्टअपमध्ये आपण आता चांगली प्रगती केली आहे. आपली बेडूक उडी आता हनुमान उडी झाली आहे. ४७६ स्टार्टअप आता ७० हजार झाले आहेत. म्हणजेच मागील सहा वर्षांत आपण चांगली प्रगती केली आहे. मी नेहमी म्हणतो विद्यार्थ्यांना की तुम्ही कुठे जन्मला, कुठल्या परिस्थितीत जन्माला, हे महत्त्वाचे नाही. तुमचे भविष्य तुमच्याच हातात आहे. शिक्षण हेच आपले भविष्य आहे. काम कोणतेही करा पण त्याच्यावर लक्ष केंद्रित करून करा. माझा जन्म गोवा येथील माशेल गावी झाला. गरीब कुटुंबात जन्म घेऊन एका गरीब मराठी शाळेत शिकलो असलो तरी माझे काही बिघडले नाही. ज्या देशात शिक्षकाला मान सन्मान नाही त्या देशाचा विकास कधीच होऊ शकत नाही, म्हणून अशा शिक्षणामध्ये ज्ञान संवर्धन, बुद्धी संवर्धन, विचार संवर्धन, क्षमता संवर्धन असणे गरजेचे आहे आणि याकडे जास्त लक्ष देणे गरजेचे आहे मात्र आज गुगल हा आपला गुरु झाला आहे, असेही माशेलकर यांनी सांगितले.

यावेळी नाम फाउंडेशन आणि जलसंपदा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सामंजस्य करार करण्यात आला. रत्नागिरी जिल्ह्यातील १५ नद्यांचे रुंदीकरण करण्यात येऊन गाळ उपोषणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. नाम फाउंडेशनचे प्रनेते अभिनेते नाना पाटेकर यांच्या उपस्थितीत हा सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी नाना पाटेकर म्हणाले, आजपर्यंत मला कोणीही जात विचारली नाही कारण माझी जात कलावंताचे आहे. जोपर्यंत माझे कार्य चालू आहे, तोपर्यंत लोक मला सिनेमागृहात बघायला येणार आहेत. माझ्या चेहऱ्यावर स्वभावाला समाजाने स्वीकारला आहे. माझा स्वभाव तिरसट आहे. तरीही मी नाट्य क्षेत्रात टिकून आहे. नाना म्हणाले की, आज सत्ताधारी आणि विरोधी पक्षाने काय केले आहे, हे सर्वांना समजले पाहिजे. कारण आम्ही या सर्वांना मते दिली आहेत. आपले कार्य फक्त उद्यापर्वा पुरते असू नये असेही नाना पाटेकर यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले की सर्वांनी साहेब ही उपाधी काढून टाकली पाहिजे. साहेब म्हटल्याने आपल्यातील अंतर वाढलेले दिसते. माझे कपडे सदैव चुरगळले दिसतात. कारण समोरच्याला वाटू नये की, त्याच्यात आणि माझ्यात अंतर आहे. राजकारणी लोकांना कशाला पाहिजेत बॉडीगार्ड, आमच्या बोटाला लावलेल्या शिक्क्याने मत सुहागन होतं. मात्र आज नवरे पळून जात आहे असाही टोला नाना पाटेकर यांनी राजकारण्यांना लगावला. सरतेशेवटी आपण काय घेऊन जाणार आहोत. जाळण्यासाठी सुकी लाकडेच लागणार आहेत. ओली लाकडे लावल्यास धूर येऊन लोकांच्या डोळ्यातून पाणी येईल. हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये भेदभाव उपयोगाचा नाही. आपण सर्व एकत्रच राहणार आहोत. राजकारणी आप मतलबी असू शकतात पण हे ओळखण्याची जबाबदारी आपली आहे. चार टकली आपल्यामध्ये भानगडी लावत असतील तर त्यांच्यावर पुल्ली मारा असेही नाना पाटेकर यांनी सांगितले.
 
आत्ताचे राजकारणी आपली तुंबडी भरण्याचे काम करत आहेत. ज्यावेळी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण गेले, तेव्हा त्यांच्या खात्यात हजार रुपये देखील नव्हते. आज आपण संतांच्या जाती मांडायला लागलो आहोत, ज्या वारकरी संतांनी समाजाला एकत्रित बांधून ठेवले होते, त्याच्यावर वाद घालण्यास सुरुवात करत आहोत. आज अशी वेळ आली आहे की, आपण कोणाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जायचे हे बघणे गरजेचे असल्याचे नाना पाटेकर यांनी सांगितले. यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. ज्येष्ठ समाजसेवक डॉ. विकास आमटे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:37 02-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow