..ऐन विधानसभा निवडणुकीत विश्वासघात होऊ नये, म्हणजे झालं! : रोहित पवार

Jun 6, 2024 - 14:27
 0
..ऐन विधानसभा निवडणुकीत विश्वासघात होऊ नये, म्हणजे झालं! : रोहित पवार

मुंबई : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला ३० तर महायुतीला केवळ १७ जागांवर यश मिळालं आहे. या निवडणुकीत काँग्रेसला सर्वात मोठे यश मिळालं तर भाजपची चांगलीच पिछेहाट झालीय.

दुसरीकडे केंद्रात भाजपप्रणित एनडीएकडून सत्ता स्थापनेसाठी तयारी सुरु झाली आहे. तर इंडिआ आघाडीने विरोधी पक्ष म्हणून जबाबदारी पार पाडणार असल्याचे म्हटलं आहे. अशातच भाजपने राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरु केली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांवर वेगळी शंका निर्माण केली आहे.

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला ४८ पैकी ३० जागांवर विजय मिळवला. भाजपला या निवडणुकीत २८ जागांवर निवडणूक लढवून केवळ ९ जागांवर विजय मिळवता आला. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला २३ जागा मिळाल्या होत्या. मात्र यावेळी मोठ्या प्रमाणात अपशय आल्याने भाजपच्या कार्यपद्धतीबाबत चर्चा सुरु झाली होती. त्यानंतर भाजप नेत्यांनी विधानसभा निवडणुकीत यापेक्षा अधिक जोर लावण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच रोहित पवार यांनी सोशल मिडिया अकाऊंटवर पोस्ट करत महाविकास आघाडीच्या काही नेत्यांसंर्भात शंका उपस्थित केली आहे. आपल्या बाजूचे काही नेते रात्रीच्या अंधारात सत्ताधाऱ्यांना भेटत तर नाहीत ना अशी शंका रोहित पवारांनी उपस्थित केली आहे.

काय म्हटलंय रोहित पवारांनी?

"राज्यात मविआला मिळालेला विराट विजय हा आदरणीय पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी न डगमगता उघडपणे केलेल्या संघर्षाचा, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीचा आणि स्वाभिमानी जनतेचा आहे. डस दाखवून प्रामाणिकपणे केलेल्या कष्टाला सत्याची जोड असेल तर यशाला कुणीही रोखू शकत नाही. पण अशा परिस्थितीत आपल्या बाजूचे काही नेते रात्रीच्या अंधारात सत्ताधाऱ्यांना भेटून काही सेटिंग तर करत नव्हते ना? याचाही शोध घेण्याची गरज आहे. अन्यथा ऐन विधानसभा निवडणुकीत विश्वासघात होऊ नये, म्हणजे झालं!,असे रोहित पवार यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

दुसरीकडे याआधी रोहित पवार यांनी अजित पवार यांचे आमदार शरद पवार यांच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. "अजित पवारांचे १९ आमदार शरद पवारांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. त्याचबरोबर त्यांच्या गटातील १२ आमदार हे भाजपच्या संपर्कात असल्याचे बोललं जात आहे. ते काय करतील हे पुढच्या काही दिवसात आपल्याला समजेल. पण या १९ आमदारांपैकी कोणाला आमच्या पक्षात घ्यायचं आणि कोणाला घ्यायचं नाही हा निर्णय आमचे पक्षप्रमुख घेतील," असं विधान रोहित पवारांनी केलं. एकीकडे आमदार संपर्कात असल्याचे माहिती दिल्यानंतर रोहित पवार यांनी त्याच दिवशी महाविकास आघाडीत नेत्यांवर भलतीच शंका उपस्थित केली. त्यामुळे आता रात्रीच्या अंधारात भेटणारे नेते कोण अशी चर्चा सुरु झाली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:49 06-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow