पावसामुळे राजापुरात साडेसात लाखांचे नुकसान

May 25, 2024 - 14:39
 0
पावसामुळे राजापुरात साडेसात लाखांचे नुकसान

राजापूर : मागील आठवड्यात राजापूर तालुक्यात वळवाच्या पावसाने धुमाकूळ घातला. वेगवान वाऱ्यामुळे तालुक्यात साडेसात लाख रुपयांचे नुकसान झाले. त्यात १३ घरे, २ गोठे आणि सार्वजनिक मालमत्तांचा समावेश आहे. तालुक्यात एका ठिकाणी घरावर वीज पडून नुकसान झाले; मात्र कुणालाही दुखापत झाली नाही. 


गुरुवारी (ता. २३) रात्रभर वळवाचा पाऊस कोसळत होता; पण शुक्रवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. वळवाच्या पावसाचे सावट अद्यापही कायम आहे. या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे गावोगावच्या तलाठ्यांमार्फत पंचनामे केले जात आहेत. त्याचा अंतिम अहवाल लवकरच तहसीलदार कार्यालयाला प्राप्त होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. मागील आठवड्यात थांबून थांबून पाऊस झाला. वेगवान वारा, ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट यामुळे काही काळ भितीचे वातावरण होते. पावसाने तालुक्यातील लोकांचे नुकसान केले आहे. घरे-गोठ्यांसह एका ग्रामपंचायत कार्यालयाचे अंशतः नुकसान झाले आहे.
 
पाणीटंचाईची तीव्रता कमी होणार
एप्रिल-मे महिन्यात वाढत्या उष्म्यामुळे नैसर्गिक जलस्रोत आटले होते. परिणामी, तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. सद्यःस्थितीत तालुक्यातील नऊ गावांतील अकरा वाड्यांना पंचायत समितीतर्फे तीन टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. मागील आठवड्यात पडलेल्या पावसामुळे पाणीसाठा वाढला आहे. परिणामी, अनेक गावातील पाणीटंचाईची तीव्रता कमी होणार आहे. हा वळवाचा पाऊस राजापूरवासियांसाठी दिलासादायक आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:55 25-05-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow