अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना जीवनगौरव पुरस्कार

Jun 15, 2024 - 11:49
 0
अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना जीवनगौरव पुरस्कार

मुंबई - नाटक करणे खूप कठीण आहे, पण त्याहीपेक्षा ते टिकवणे खूप कठीण असल्याची भावना ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी व्यक्त केली. नाट्य परिषदेच्या वतीने जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आल्यानंतर ते बोलत होते.

ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनाही जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही नाटककार गो. ब. देवल स्मृतीदिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने यशवंत नाट्यगृहाध्ये पुरस्कार वितरण, कलावंत मेळावा आणि यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुल रसिकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना यावेळी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नाट्य परिषदेचे तहहयात विश्वस्त शरद पवार, तहहयात विश्वस्त शशी प्रभू, विश्वस्त उदय सामंत, नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, नाटय संमेलनाध्यक्ष जब्बार पटेल, विश्वस्त मोहन जोशी, अशोक हांडे, पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या निमित्ताने 'नाट्यकलेचा जागर'चे सादरीकरण करण्यात आले.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर अशोक सराफ म्हणाले की रांगेत चार मोठे पुरस्कार मिळाले आहेत. महाराष्ट्र भूषण, संगीत कला अकादमी पुरस्कार आणि मा. दीनानाथ मंगेशकर पुरस्कारानंतर मिळालेला हा नाट्य परिषदेचा पुरस्कार खूप मोठा आहे. हा आनंद शब्दांत वर्णन करणणे कठीण आहे. पोलिसांनी माझ्यावर जीवापाड प्रेम केले आहे. कुठेही अडकलो की सोडतात. पोलिसांना मी खूप जवळचा वाटतो असे म्हणत त्यांनी एक किस्सा सांगितला.

रोहिणी म्हणाल्या की, हा सन्मान घरातून शाबासकीची थाप देणारा आहे. एनएसडीतून १९७४ साली बाहेर पडले. त्या गोष्टीला २०२४ मध्ये ५० वर्षे पूर्ण होत असताना हा पुरस्कार मिळाल्याचा आनंद आहे. प्रत्येक व्यक्तिरेखेद्वारे माणूस समजून घेण्याचा प्रयत्न केला. हातपाय चालतील तोपर्यंत कोणत्या ना कोणत्या माध्यमातून रंगभूमीची सेवा करत राहीन असेही त्या म्हणाल्या.

दोन दिग्गज व्यक्तिमत्वांचा सन्मान केल्याचा आनंद शरद पवार यांनी व्यक्त केला. प्रशांत दामले म्हणाले की, जब्बार पटेल यांच्यासोबत महाराष्ट्र पिंजून काढणार असून, जिथे जे आवश्यक ते करू. महाराष्ट्रातील सर्व नाट्यगृहे नाट्य परिषदेच्या ताब्यात द्यावीत आम्ही ती अशीच सुंदर करून दाखवू अशी खात्री दामले यांनी दिली.

उदय सामंत म्हणाले की, रत्नागिरीतील सर्व नाट्यगृहाना सोलर सिस्टीम बसवली असून, संपूर्ण महाराष्ट्रात सोलर सिस्टीम बसवली जाईल. मुंबई जवळची दोन एकर जागा कलाकारांच्या वृद्धाश्रमासाठी देणार आहोत. त्यासाठी २५ कोटी रुपये देणार आहोत. मी म्हाडाचा अध्यक्ष असताना कलाकार आणि तंत्रज्ञासाठी ३०० घरांचा प्रकल्प राखीव ठेवला आहे. त्यासाठी नाट्य परिषदेने पुढाकार घ्यायला हवा. पुढच्या २४ मे पूर्वी कमीत कमी ५० कलाकारांना घर मिळवून देऊ असे सामंत म्हणाले.

पोलीस आणि सराफांच्या संबंध येऊ नये पण आम्ही आज सराफांचा गौरव करण्यासाठी जमलो आहोत असे फणसाळकर म्हणाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:01 15-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow