रत्नागिरी : कळझोंडी धरण भरले; ३० गावांचा पाणी प्रश्न सुटणार

Jun 27, 2024 - 14:13
 0
रत्नागिरी : कळझोंडी धरण भरले; ३० गावांचा पाणी प्रश्न सुटणार

जाकादेवी : तालुक्यातील जयगड पंचक्रोशीमधील ३० गावांतील २५ हजारांहून अधिक लोकांना पाणीपुरवठा करणारे कळझोंडी येथील जिल्हा परिषदेचे धरण अखेर आठवडाभराच्या पावसाने पूर्णपणे भरून वाहू लागले आहे या धरणाची उंची वाढवण्याचे काम गेले काही महिने सुरू होते. पावसाळात पूर्ण झाले होते. त्याचा परिणाम उन्हाळ्यात येथील लोकांना बसला होता, धरण भरल्यामुळे पुढील वर्षी पाण्याअभावी टंचाई उद्भवणार नाही, अशा प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केल्या.

कळझोंडी धरण पूर्णपणे भरल्याचे समजताच जयगड प्रादेशिक नळपाणी योजनेवर अवलंबून असलेल्या गावांतील लोकांनी समाधान व्यक्त केल. जयगड प्रादेशिक नळपाणी योजनेचे सुपरवायझर दत्ताराम निंवरे त्याचबरोबर धरणाचे बांधकाम करणारे सर्जेराव माने, दत्ताजी माने यांच्या मार्गदर्शनाखाली कामकाज व्यवस्था पाहणारे शशिकांत शिंदे, राजू गायकवाड, सत्ताप्पा मेंडके, सागर, तंटामुक्ती अध्यक्ष संदीप पवार, किशोर पवार यांनी भरलेल्या धरणाची पाहणी केली. कळझोंडी धरणाची उंची वाढवणे, जंकेटिंग, प्राऊटिंग आदी कामे गेली दोन वर्षे सुरू होती, धरणाकडे जाणारा रस्ता डांबरीकरण करणे, आरसीसी ब्रीज बांधणे यांसह अन्य महत्वाची कामेही पावसाळ्यापूर्वी पूर्ण झाली.

कळझोंडी गावातील पूर्वीच्या नदीवरील तीनही पूल पाण्याखाली गेले असले तरीही नव्याने बांधण्यात आलेल्या तीन पुलावरून रहदारीसाठी सुरळीत झाली आहे. हे काम जलजीवन मिशनअंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडून करण्यात आले, स्वस्तिक कन्स्ट्रक्शन कोल्हापूरचे सर्जेराव माने यांनी हे काम वेळेत व यशस्वीरित्या काम पूर्ण केले. धरणाकडे जाणाऱ्या रस्त्याचे शिल्लक काम पावसाळ्यानंतर केले जाणार आहे. 

कळझोंडी धरणाची उंची वाढवल्यामुळे संपूर्ण धरण परिसर जलमय झाला आहे. पाण्याची पातळी विस्तारली असल्यामुळे ही पातळी पाहण्यासाठी गावातील ग्रामस्थ, पर्यटक या परिसराला भेटी देत आहेत. थोड्याच दिवसात जयगड प्रादेशिक ग्रामीण नळपाणी पुरवठा योजना अतिशय उत्तमप्रकारे चालवण्यासाठी मदत होईल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला

धरणातील साठा तिप्पट
कळझोंडी परणाची उंची साडेतीन मीटर होती. ती वाढवून साडेपाच मीटर करण्यात आली आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा तिप्पट झाला आहे. धरणाची उंची वाढल्यामुळे बॅकवॉटरमुळे आजूबाजूच्या लोकांना त्रास होऊ नये यासाठी आधीच जमिनी प्रशासनाने ताब्यात घेतल्या होत्या. या धरणासह आजूबाजूच्या कामासाठी २१ कोटी रुपये मंजूर आहेत, वाढीव साठ्यामुळे कोणालाही अडचण निर्माण होणार नाही, असे सांगितले जात आहे.

टंचाईची तीव्रता नाही
फेब्रुवारी ते जून २०२४ या पाच महिन्यांच्या कालावधीत पालकमंत्री उदय सामंत यांनी जिंदाल कंपनीकडून पाणीपुरवठा सुरू करून दिला होता. त्यामुळे येथील नागरिकांना पाणीटंचाईचा मोठा फटका बसलेला नाही. पालकमंत्री सामंत आणि जिंदाल कंपनीचे व्यवस्थापक यांचे स्थानिक ग्रामस्थांनी आभार मानले आहेत. पाणीपुरवठा विभागाचे नियोजन प्रांताधिकारी जीवन देसाई, जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी उपअभियंता अमोल दाभोळकर यांच्यासह कनिष्ठ अभियंता प्रसाद सुर्वे, जयगड प्रादेशिक नळपाणी योजनेचे सुपरवायझर दत्ताराम निंवरे यांनी उत्तम देखरेख ठेवली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:41 PM 27/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow