रत्नागिरी : 'हाफ' तिकिटामुळे एसटीची तिजोरी 'फुल्ल'!

Jul 11, 2024 - 17:26
 0
रत्नागिरी : 'हाफ' तिकिटामुळे एसटीची तिजोरी 'फुल्ल'!

रत्नागिरी : रत्नागिरी विभागातर्फे शहरी वाहतुकीमध्ये महिला सन्मान योजना लागू झाल्यापासून आतापर्यंत १ लाख ३० हजार ८१३ महिलांनी शहर वाहतूक बसेस मधून प्रवास केला असून, यातून एसटीला १० लाख ९३ हजारांचे उत्पन्न मिळाले. केवळ सतरा दिवसांत शहर एसटीच्या तिजोरीत १० लाखांची भर पडली आहे.

राज्य शासनाने जाहीर केलेल्या शहरी वाहतुकीत महिला सन्मान योजना सवलतीचा शुभारंभ व प्रवास करणाऱ्या महिलांचा सन्मान काहीच दिवसांपूर्वी पालकमंत्री उदय सामंत यांचा हस्ते करण्यात आला होता. या सन्मान योजनेतर्गत शहरी वाहतुकीत महिला प्रवाशांना प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत, ज्येष्ठ नागरिक योजनेत ६५ ते ७५ वर्षापर्यंतच्या नागरिकांना शहर वाहतूक प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत. अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेर्तगत ७५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना संपूर्ण मोफत प्रवास सवलत योजना लागू करण्यात आली आहे. 

शासनाची ग्रामीण वाहतुकीला लागू असलेली सवलत योजना शहर वाहतुकीला लागू नव्हती. मात्र, पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नाने महामंडळाच्या शहर वाहतुकीला योजना लागू झाल्यानंतर शहर वाहतुकीला नवसंजीवनी प्राप्त झाली आहे. यामुळे एसटीच्या उत्पन्नात मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

हाफ तिकिटामुळे एसटी महामंडळाला भुर्दंड पडेल असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, या योजनेमुळे रत्नागिरी एसटीच्या तिजोरीत चांगलीच वाढ होत आहे. मुळात गेले अनेक वर्ष रत्नागिरी एसटीचे काही ठरावीक हंगाम सोडल्यास उत्पन्न कमी होते. मात्र, या योजनेमुळे एसटीचे उत्पन्न वाढले. सुरुवातीला ग्रामीण भागातील महिला प्रवाशांसाठीच ही योजना लागू होती. त्यामुळे ही योजना शहरातही लागू करावी, अशी मागणी प्रवशांमधून करण्यात आली आणि शासनाने याची अंमलबजावणी २३ जूनपासून सुरू केली.

आतापर्यंत १ लाख ३० हजार महिलांनी प्रवास केल्यामुळे या योजनेचा लाभ महिला प्रवासी घेत असल्याचे दिसून येत आहे. तसेच एसटीच्या उत्पन्नातदेखील घसघशीत वाढ होत आहे. यामुळे महिलांबरोबरच एसटी प्रशासनही समाधान व्यक्त करत आहे.

'वाट पाहू पण एसटीनेच जाऊ'
हाफ तिकीट झाल्यामुळे महिलावर्ग आता एसटीनेच प्रवास करत आहे. हाफ तिकीट असताना इतर वाहनांनी का जायचे, त्यापेक्षा वाट पाहू पण एसटीनेच जाऊ, असा सूर महिला वर्गातून उमटत आहे. तसेच ग्रुपने महिला प्रवास करतानाचे दृश्य एसटीत मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे.

शासनाने ग्रामीण व शहर दोन्ही प्रवासात ५० टक्के सवलत दिल्याने विभागाच्या उत्पन्नात चांगली वाढ झाली आहे. यामुळे एस.टी. महामंडळाला दिलासा मिळाला आहे. - प्रज्ञेश बोरसे,
विभाग नियंत्रक, रत्नागिरी.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:53 11-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow