रत्नागिरी : श्री भैरीची उद्या आषाढ दशमी ग्रामप्रदक्षिणा

Jul 15, 2024 - 15:13
 0
रत्नागिरी : श्री भैरीची उद्या आषाढ दशमी ग्रामप्रदक्षिणा

रत्नागिरी : रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री भैरी देवाची ग्रामप्रदक्षिणा आषाढ दशमीच्या दिवशी काढण्यात येणार आहे. शिमगोत्सवात श्री भैरी देवाची पालखी प्रथमच आषाढात भाविकांच्या ख्याली खुशालीसाठी ग्रामप्रदक्षिणा करणार आहे. आषाढ शुद्ध दशमी व आषाढ कृष्ण दशमीच्या दिवशी प्रथेप्रमाणे पालखी ग्रामप्रदक्षिणा करणार आहे.

झाडगाव येथील श्री देव भैरी जोगेश्वरी नवलाई पावणाई, तृणबिंदुकेश्वर ट्रस्टच्या वतीने आषाढ व श्रावण महिन्यात देवस्थानचे विविध उत्सव साजरे होणार आहे. पहिल्या आषाढ दशमीला म्हणजे १६ जुलैला ग्रामप्रदक्षिणा होणार आहे. झाडगाव येथील श्री भैरी मंदिरातून गाऱ्हाणे होऊन पालखी निघते. त्यानंतर खालची आळी, मुरलीधर मंदिर, टिळक आळी, झाडगाव येथे पटवर्धन व सावंत खोत यांच्या घरी पालखी नेण्यात येते. नंतर जोशी पाळंद मार्गे झाडगाव, परटवणे येथे श्री. खंडकर यांच्या घरी बसून वरचा फगरवठार येथील सहाणेवर बसते. त्यानंतर फाटक हायस्कूल, गोखले नाका, मारुती आळी, कोतवडेकर यांच्या सहाणेवरून पऱ्याची आळी, ढमालनीचा पार, विठ्ठल मंदिर, खालची आळीमार्गे पुन्हा झाडगाव येथील श्री भैरी मंदिरात नेण्यात येते. प्रथेप्रमाणे पालखी ग्रामप्रदक्षिणा करणार आहे. 

२१ जुलै रोजी भैरीदेवाचा बळ उत्सव होणार आहे. आषाढ कृष्ण दशमीला म्हणजे ३० जुलै रोजी दुसरी ग्रामप्रदक्षिणा प्रथेप्रमाणे काढण्यात येणार आहे.

आषाढ महिन्यानंतर सणांचा राजा श्रावण महिना ५ ऑगस्ट रोजी सुरू होणार आहे. यात तृणबिंदूकेश्वरावर श्रावण प्रतिपदेपासून महिना अखंड संततधार अभिषेक व रुद्रपठण करण्यात येणार आहे. १९ ऑगस्टला पोवते पौर्णिमा साजरी होईल. ४ सप्टेंबरला संततधार सांगता होणार आहे. संततधारेकरिता ब्रह्मवृंद मंडळी रुद्रपठण करतात. 

आषाढ, श्रावण महिन्यात आयोजित केलेल्या ग्रामदैवत भैरी देवाच्या सर्व उत्सवामध्ये सर्व भक्तांनी सहभागी व्हावे, असे आवाहन श्री भैरी देवस्थानचे अध्यक्ष मुन्नाशेठ सुर्वे यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:41 15-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow