Ratnagiri : ग्रामसेवक भरतीमध्ये जिल्ह्यात परीक्षेसाठी केंद्र उपलब्ध असूनही स्थानिक उमेदवारांना परजिल्ह्यात परीक्षा केंद्र

Jul 16, 2024 - 15:37
Jul 16, 2024 - 15:40
 0
Ratnagiri : ग्रामसेवक भरतीमध्ये जिल्ह्यात परीक्षेसाठी केंद्र उपलब्ध असूनही स्थानिक उमेदवारांना परजिल्ह्यात परीक्षा केंद्र

रत्नागिरी : जिल्हा परिषदेमध्ये सध्या ग्रामसेवक तसेच इतर पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु आहे. लेखी परीक्षा सुरु आहे. मात्र या भरतीत विशेषतः ग्रामसेवक परीक्षेमध्ये सावळा गोंधळ दिसून येत आहे. जिल्ह्यात परीक्षेसाठी केंद्र उपलब्ध असूनही स्थानिक उमेदवारांना परजिल्ह्यात विशेषकरून पुणे, नागपूर, मुंबई या ठिकाणी परीक्षा केंद्र देण्यात आली आहे. यामुळे अनेक उमेदवारांनी दांडी मारली तर बसलेल्या उमेदवारांना नाहक आर्थिक भुर्दड बसला आहे.

जिल्हा परिषद वर्ग ३व ४या भरती प्रक्रिया सहा महिन्यांपूर्वी सुरु झाली. यामध्ये विविध संवर्गाच्या ७०० जागा रिक्त होत्या. त्यासाठी भरती प्रक्रिया होती. यापैकी अनेक जागांसाठी लेखी परीक्षाही घेण्यात आली होती. मात्र मध्यंतरी यातील काही संवर्गातील पदासाठी भरतीवर आक्षेप घेत काही उमेदवार न्यायालयात गेले होते. विशेषतः ग्रामसेवक या पदा‌साठी न्यायालयात गेले होते. हा विषय न्यायालयाने निकाली काढत भरती करण्याचे आदेश दिले. परंतु त्याच दरम्यान लोकसभा निवडणूक आल्याने ही भरती प्रक्रिया अडकली.

ग्रामसेवक पद सोडून इतर पदांसाठी ३ ते १९ ऑक्टोबर २०२३ या दरम्यान परीक्षा झाली होती. मात्र ग्रामसेवक, आरोग्य सेवक लेखी परीक्षा राहिली होती. आरोग्य सेवक लेखी परीक्षा जवळपास पूर्ण झाली आहे. त्यानंतर ग्रामसेवक लेखी परीक्षाही जळपास पूर्ण झाली आहे. या ग्रामसेवकाच्या १८५ जागांसाठी ४९ उजार अर्ज दाखल झाले होते. यामुळे ही परीक्षा टप्प्यापट्याने घेण्यात आली. 

ग्रामसेवक  भरतीमध्ये लेखी परीक्षेसाठी जिल्ह्यात ३ केंद्र घेण्यात आली होती मात्र प्रत्यक्षात एक केंद्रच घेण्यात आली, यामुळे परीक्षेसाठी नेमलेल्या कंपनीने हा गोंधळ घालत अनेक स्थानिक उमेदवारांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. त्याचबरोबर स्थानिक उमेदवारांनी रत्नागिरीसह, कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, सातारा या ठिकाणची परीक्षा केंद्र टाकली होती. मात्र या उमेदवारांना ती केंद्रसुद्धा देण्यात आली नाहीत, या स्थानिक उमेदवारांना पुणे, मुंबई, नागपूर याठिकाणची देण्यात आली.

ही सर्व लांबची केंद्र मिळाल्याने अनेक उमेदवारांनी न जाण्याचा निर्णय घेतला विशेषतः महिला उमेदवारांची संख्या जास्त होती. काहींनी आर्थिक गोष्टींचा विचार केला. कारण इतक्या महागडा शहरात राहण्याचा प्रश्न होता. एकंदरीत अगोदरच बेरोजगार असलेल्या उमेदवारांना इतका आर्थिक खर्च करणे न परवडणारे होते. काहीनी पदरमोड करून परीक्षा दिली कंगनीच्या या भोंगळ कारभाराचा फटका स्थानिक उमेदवारांना चांगलाच बसला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:04 PM 16/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow