राममंदिर बांधणारे व रामभक्तांवर गोळीबार करणारे या दोघांमध्ये लढत : अमित शाह

May 30, 2024 - 13:54
 0
राममंदिर बांधणारे व रामभक्तांवर गोळीबार करणारे या दोघांमध्ये लढत : अमित शाह

देवरिया : अयोध्येत राममंदिर बांधणारे व रामभक्तांवर गोळीबार करणारे या दोघांमध्ये यंदाच्या लोकसभा निवडणुकांत लढत होत आहे, असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले आहे.

देवरिया येथील भाजपचे उमेदवार शशांकमणी त्रिपाठी यांच्या प्रचारासाठी बुधवारी आयोजिलेल्या सभेत ते म्हणाले की, विरोधी पक्षांनी ७० वर्षे अयोध्येत राममंदिर बांधले जाऊ नये यासाठी प्रयत्न केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच हे मंदिर उभारले गेले.

१९९० साली उत्तर प्रदेशात तत्कालीन मुख्यमंत्री मुलायमसिंह यांनी कारसेवकांवर गोळीबार करण्याचा आदेश दिला होता. त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर अमित शाह म्हणाले की, रामभक्तांवर गोळीबार करणाऱ्यांविरोधात या लोकसभा निवडणुकांत आम्ही लढत देत आहोत. देवरियाच्या आधी शाह यांची महाराजगंज येथे प्रचारसभा झाली. त्यात त्यांनी सांगितले की, काँग्रेस, समाजवादी पक्षाने लोकसभा निवडणुकांत पराभव झाल्यानंतर त्याचे खापर ईव्हीएमवर फोडण्याचा निर्णय घेतला आहे. या निवडणुकांची मतमोजणी ४ जूनला होईल. त्या दिवशी राहुल गांधी व अखिलेश यादव हे दोन शहजादे ईव्हीएमला दोष देतील, अशी टीका अमित शाह यांनी केली.

पाच वर्षांत पाच पीएम!

शाह म्हणाले की, पहिल्या पाच टप्प्यांमध्ये मोदींच्या नेतृत्वाखाली आघाडीला ३१० जागा मिळतील, अशी आम्हाला खात्री आहे. राहुल गांधी यांच्या पक्षाला ४० जागाही जिंकता येणार नाहीत. तर अखिलेश यादव यांना फक्त चार लोकसभा जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षांकडे पंतप्रधानपदाचा उमेदवार नाही. इंडिया आघाडी केंद्रात सत्तेवर आली तर पुढील पाच वर्षांत पाच पंतप्रधान त्या खुर्चीवर विराजमान झालेले दिसतील, अशी टीकाही अमित शाह यांनी केली.

पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणारच : गृहमंत्री

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, पाकिस्तानव्याप्त काश्मीर हा भारताचा भाग होता आणि यापुढेही तो राहील. आम्ही हा भाग ताब्यात घेणारच. पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे, असे सांगून विरोधी पक्ष भारतातील नागरिकांना घाबरविण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:09 30-05-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow