'अलमट्टीचा पाणीसाठा कमी करा; अन्यथा सांगली, कोल्हापूरला पुराचा धोका'

Jul 18, 2024 - 16:51
Jul 18, 2024 - 16:57
 0
'अलमट्टीचा पाणीसाठा कमी करा; अन्यथा सांगली, कोल्हापूरला पुराचा धोका'

सांगली : कर्नाटकातील अलमट्टी धरण आणि कृष्णा नदीवरील हिप्परगी बंधाऱ्यामध्ये नियमबाह्य पाणीसाठा केला आहे. या पाणीसाठ्यामुळेसांगली, कोल्हापूर जिल्ह्यांना पुराचा धोका निर्माण होणार आहे.

म्हणून महाराष्ट्र सरकारने कर्नाटक पाटबंधारे विभागाला अलमट्टी धरणातील पाणीसाठा कमी करण्याची सूचना द्यावी, अशी मागणी कृष्णा महापूर नियंत्रण कृती समितीने राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याकडे गुरुवारी निवेदनाद्वारे केली आहे. तसेच १ ऑगस्टला नृसिंहवाडी, सांगलीत जलबुडी आंदोलन करण्याचा इशारा निमंत्रक सर्जेराव पाटील यांनी दिला.

कृष्णा महापूर नियंत्रण समितीचे सेवानिवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण म्हणाले, अलमट्टी धरण आणि हिप्परगी बंधाऱ्यांमध्ये कर्नाटक शासनाचा जलसंपदा विभाग केंद्रीय जल आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करून भरमसाट पाणीसाठा करीत आहे. कृष्णा खोऱ्यातील सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. अलमट्टीत पाणीसाठा केल्यामुळे महापुराचा धोका निर्माण होत आहे.

याबाबत आम्ही वारंवार जिल्हा प्रशासन, जलसंपदा विभागाचे सांगली व कोल्हापूरमधील कार्यकारी अभियंता यांना निवेदने दिली आहेत. आंदोलने केली आहेत. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. म्हणून आम्ही दि. १ ऑगस्ट रोजी नृसिंहवाडी येथे पंचगंगा नदीत आणि सांगलीत कृष्णा नदीत जलबुडी आंदोलन करणार आहोत. शेकडो नागरिक आणि शेतकरी जलबुडी आंदोलनात सहभागी होणार आहेत. निवेदनावर निवृत्त अभियंता प्रभाकर केंगार, आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे, दीपक पाटील आदींच्या सह्या आहेत.

जनहित याचिका दाखल करणार

सांगली व कोल्हापूर जिल्हा प्रशासन, येथील जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता यांना आम्ही कायदेशीर नोटीस दिली आहे. दि. २६ जुलैपर्यंत वाट पाहून आम्ही त्यांच्याविरोधात न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार आहोत, असा इशारा सर्जेराव पाटील यांनी दिला आहे.

पावसाची सहा नक्षत्रे शिल्लक, तोपर्यंत धरण भरले

पावसाळ्यातील नऊ नक्षत्रे ही पावसाची म्हणून ओळखली जातात. पहिली तीन नक्षत्रेही अजून संपलेली नाहीत. याचा अर्थ पावसाळा सुरू होऊन अजून जेमतेम दोन महिनेसुद्धा झालेले नाहीत. जोरदार पावसाची सहा नक्षत्रे अजून शिल्लक आहेत. तरीही कर्नाटक सरकार व तेथील जलसंपदा विभाग घाई करून धरणात पाणीसाठा वाढवत असून, त्यांची ही कृती अत्यंत धोकादायक आहे, असा आरोपही सेवानिवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण यांनी केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:23 18-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow