श्री गणेशाच्या स्वागतासाठी बाजारपेठ सजली

Aug 31, 2024 - 17:18
 0
श्री गणेशाच्या स्वागतासाठी बाजारपेठ सजली

रत्नागिरी : भक्तांना आपल्या भक्तीत दंग करणाऱ्या लाडक्या गणपती बाप्पांच्या आमगनाला आता काहीच राहिल्याने बाजारपेठेत सजावट व पूजेच्या साहित्य खरेदीला उधाण आले आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावर एवढी गर्दी आणि नागरिक व बाजारपेठेत अमाप उत्साह दिसून येत आहे. दुसरीकडे घराघरांत आरासाच्या मांडणीची लगबग सुरू आहे.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत लाडक्या गणपती बाप्पांचा गणेशोत्सव येत्या शनिवारी सुरू होत आहे. बाप्पांच्या आगमनाच्या स्वागतासाठी बाजारपेठेत मखर, आसन, विद्युतमाळा, झुरमुळ्या, फुलांच्या माळा, वेली, झुंबर, तोरण, पडदे अशा साहित्यांच्या खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली आहे. शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी असून पूजेच्या साहित्यांची रेलचेल आहे. त्यामुळे बाजारपेठेत रस्त्यांवर वाहनांची मोठी वर्दळ आहे. 

गणरायाची आरास करण्यासाठी कागदी फुलांच्या माळा, मखमली टिकली वर्कचे पडदे, कापडी मांडव, कागदी आसने, मंदिरे व फुलोरा, गणरायासाठी छत्र तसेच पेशवाई, पुणेरी व शिंदेशाही पगड्या बाजारात उपलब्ध आहेत. कापडी मंडप व स्क्रीन पेंटिंगची आसने आणि तरंगते दिवे, रांगोळी आदी साहित्यही विक्रीस आहे. पुठ्ठ्यापासून, जाड कागदापासून व पडद्यापासून बनविलेली मखरे फोल्ड करणारी असल्याने गणेशोत्सव झाल्यानंतर पुन्हा बंद करून ठेवली जाऊ शकतात. त्यामुळे या मखरांना ग्राहकांची मागणी वाढलेली आहे.

एलईडी इंडियन, एलईडी माळा, डमरू माळ, चेरीलाइट अशा विद्युत माळांही उपलब्ध आहेत. आकर्षक कागदी व फायबर मखरे, गौरीकमळ, फुलोरा, सिंहासन यांना नेहमीप्रमाणे मागणी आहे. 200 रुपयांपासून चार हजार रुपयांपर्यंत त्यांच्या किमती आहेत. गौरींचे विविध प्रकारचे मुखवटे, साड्या आणि विविध प्रकारचे दागिनेही उपलब्ध आहेत.

इकोफ्रेंडली मखरांना पसंती यंदा कारागिरांनी पुठ्ठा, कागद, कापड यापासून इकोफ्रेंडली मखरे तयार केली आहेत. या मखरांमध्ये सिंहासन, मंदिर, निसर्ग मखर, पाळणा, पुष्प सजावट मखर, महाल यांसारखी आकर्षक मखरे बाजारात विक्रीस ठेवण्यात आली आहेत. याची किंमत दोन हजारांपासून पाच हजार रुपयांपर्यत आहेत. 

दुसरीकडे घराघरांत सजावट, आरासाच्या साहित्यांची मांडणी सुरू झाली आहे. गेल्यावर्षी सांभाळून, जपून ठेवलेले सजावटीचे साहित्य काढून ते स्वच्छ करणे, त्यातील खराब झालेले साहित्य बाजूला काढून यंदाची आरास कशी करायची यावर चर्चा सुरू आहे. काही घरांमध्ये तर मांडणीही पूर्ण झाली आहे. या काळात ध्वनिप्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:48 31-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow