चिपळूण तालुक्यातील टेरव सरपंचांचा आत्मदहनाचा निर्णय मागे

May 31, 2024 - 10:19
May 31, 2024 - 10:21
 0
चिपळूण तालुक्यातील टेरव सरपंचांचा आत्मदहनाचा निर्णय मागे

◼️ पाणीयोजनेचे काम रखडले; आमदार निकमांची गटविकास अधिकाऱ्यांसमवेत बैठक

चिपळूण : तालुक्यातील टेरव येथे मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई जाणवत आहे. त्यातच मंजूर असलेल्या पाणीयोजनांची कामेही रेंगाळली आहे. टेरव बुद्रुक दत्तवाडी पाणीपुरवठा योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे देऊनही साठवण टाकीचे काम सुरू होत नव्हते. यासाठी टेरव सरपंच किशोर कदम यांनी पंचायत समितीसमोर आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर आमदार शेखर निकम यांनी गटविकास अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन साठवण टाकीची जागा निश्चित करण्याचे ठरवल्यानंतर आत्मदहनावर समन्वयाने तोडगा काढण्यात आला.

गेल्या वर्षापासून टेरव येथील जलजीवन मिशन योजनेतील पाणीयोजनेचा मुद्दा गाजतो आहे. या योजनेबाबत काही ग्रामस्थांनी न्यायालयात दाद मागितली आहे. त्यातच टेरव बु. दत्तवाडी पाणीयोजनेचेही काम रेंगाळले आहे. या योजनेच्या साठवण टाकीसाठी संबंधितांनी जागा उपलब्ध करून दिली; परंतु एकूण क्षेत्रातील साठवण टाकीची जागा नेमकी कोणती याची स्पष्टता झाली नव्हती. साठवण टाकीचे काम होत नसल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले होते तर नियमाला कलाटणी दिल्यास दुसऱ्या गटाची तक्रार होते. या तक्रारींमुळे अधिकारी कात्रीत सापडले आहेत. त्यामुळे त्यांनीही टेरवमध्ये रितसर काम करण्याची भूमिका घेतली. सरपंच किशोर कदम यांनी १ जूनला आत्मदहन करण्याचा निर्णय घेतल्याने आमदार शेखर निकम यांनी पंचायत समितीत बैठक घेतली. या वेळी गटविकास अधिकारी उमा घार्गे-पाटील, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी, सरपंच किशोर कदम, माजी सरपंच स्वप्नाली कराडकर, ग्रामविकास अधिकारी, विस्तार अधिकारी आदी उपस्थित होते. 

बैठकीत साठवण टाकीबाबत चर्चाचा करताना सदरची जागा मोजणी करून निश्चित करण्याचे ठरवण्यात आले. याशिवाय जलजीवन पाणीयोजनेच्या साठवण टाकीबाबतही जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा सुरू असल्याचे आमदार निकम यांनी स्पष्ट केले. दत्तवाडी पाणीयोजनेच्या साठवण टाकीच्या जागेचा नकाशा निश्चित झाल्यानंतर तेथील कामाला सुरवात केली जाणार आहे. काम मार्गी लावण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर सरपंच कदम यांनी आत्मदहनाचा निर्णय मागे घेतला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:42 AM 31/May/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow