विकृतांना ठेचून काढायची ताकद स्त्रीमध्ये : चित्रा वाघ

Sep 2, 2024 - 10:05
Sep 2, 2024 - 10:08
 0
विकृतांना ठेचून काढायची ताकद स्त्रीमध्ये : चित्रा वाघ

रत्नागिरी : लहान मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना मनाला खूप वेदना देऊन जातात. सरकार, पोलिस त्यांची जबाबदारी पार पाडत आहेत. पण आज आपण आई, ताई म्हणून आपलीसुद्धा तेवढी जबाबदारी आहे. समाजात वावरणाऱ्या विकृत, हरामखोरांना ठेचून काढायची ताकद स्त्रीमध्ये आहे. उगाच आपल्याला दुर्गा म्हणत नाहीत, असे प्रतिपादन भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केले.

तसेच रस्त्यात कोणी अडचणीत असेल तर ताई, माईला मदत करा. एखादी भगिनी रडताना दिसली तर तुमच्या दोन मिनिटांच्या थांबण्याने फरक पडू शकतो, असे आवाहनही वाघ यांनी यावेळी केले.

भारतीय जनता पार्टी रत्नागिरी शहर आणि दि यश फाऊंडेशन संस्था आयोजित मंगळागौर, खेळ पैठणीचा या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. शनिवारी दुपारपासून रात्रीपर्यंत जयेश मंगल पार्क येथे हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

त्याप्रसंगी चित्रा वाघ यांनी कार्यक्रमाला भेट देऊन माजी आमदार बाळ माने, जिल्हाध्यक्ष राजेश सावंत आणि सर्व महिला मोर्चाचे कौतुक केले. या कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद लाभला. 

यावेळी त्या म्हणाल्या, कार्यक्रमात सर्व भगिनी छान दिसत आहेत. रत्नागिरीकरांचा उत्साह बघून खूप आनंद झाला. आज सर्वांचे लाडके देवाभाऊ रत्नागिरीतील भगिनींशी बोलले. त्यांचेही आभार मानते. आज मला जन्म बाईचा, बाईचा खूप घाईचा एक आईचा एक ताईचा हे गीत आठवते. या गाण्याचा अर्थ असा की एवढी नाती आहेत. मुलगी, बहीण, सून, काकी, मामी, आत्या कितीतरी भूमिका आहेत.

आपल्या सर्व भूमिका पार पाडून आपण समाजासाठी वेळ देतो, परमेश्वराची उत्कृष्ट कला म्हणजे स्त्री. आपल्या सर्वांवर भविष्याची पिढी घडवण्याची जबाबदारी आहे, असे चित्रा वाघ म्हणाल्या.
या कार्यक्रमाला दि यश फाऊंडेशनच्या सहव्यवस्थापकीय विश्वस्त माधवी माने, शिवानी सावंत, सावंत, भाजप महिला मोर्चा प्रदेश सचिव शिल्पा मराठे, जिल्हाध्यक्ष सुजाता साळवी, ऐश्वर्या जठार, पल्लवी पाटील, शोनाली आंबेरकर यांच्यासह महिला मोर्चा पदाधिकारी व रत्नागिरीतील भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:30 AM 02/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow