संगमेश्वरात नऊ विद्यार्थिनींचा विनयभंग; नराधम शिक्षक अटकेत

Sep 2, 2024 - 10:29
 0
संगमेश्वरात नऊ विद्यार्थिनींचा विनयभंग; नराधम शिक्षक अटकेत

देवरूख : रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात शनिवारी मुलींवर अत्याचाराची धक्कादायक घटना उघड झाली आहे. एका जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकास नऊ विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, याप्रकरणी संतप्त जमावाला शांत करण्यासाठी राज्य राखीव दलाची कुमक मागवावी लागली.

याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या शिक्षकाला सायंकाळी देवरूख येथील दिवाणी न्यायालयापुढे हजर करण्यात आले असताना न्यायाधीशांनी दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

नुकत्याच घडलेल्या बदलापूर व रत्नागिरी येथील अत्याचाराच्या घटनांमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. राज्यात अनेक ठिकाणी मुलींवर अत्याचाराच्या घटना घडत असताना संगमेश्वर तालुक्यातही संतापजनक आणि गुरू-शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारा प्रकार समोर आला आहे. संजय वसंत मुळ्ये (४७, रा. आंबेड) असे या शिक्षकाचे नाव आहे. त्याने पाचवी व सहावीच्या वर्गात शिकणाऱ्या नऊ मुलींचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. या नराधम शिक्षकावर संगमेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. 

शिक्षक संजय मुळ्ये काही दिवसांपासून त्याच शाळेतील पाचवी व सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनींबरोबर अश्लील वर्तन व शारीरिक छेडछाड करत होता. अखेर या प्रकाराला कंटाळून पीडित मुलींनी हा सारा प्रकार आपल्या पालकांना सांगितला. याचा जाब विचारण्यासाठी शुक्रवारी शाळेत शाळा व्यवस्थापन समिती, पालकांची केंद्रप्रमुख यांनी बैठक आयोजित केली होती. या बैठकीत पालकांनी या शिक्षकाच्या वर्तनाचा पाढा वाचला. यावेळी त्या शिक्षकाला मुलींनी केलेल्या तक्रारीसंदर्भात जाब विचारला असता हा शिक्षक आपण असे कृत्यच केले नाही, अशी उत्तरे देत होता. त्यामुळे उपस्थित पालक व ग्रामस्थ अधिकच आक्रमक झाले. अखेर संतप्त पालकांचा आक्रमक पवित्रा पाहून या शिक्षकाने माफी मागितली. 

२७ ऑगस्टपूर्वी ८ दिवस हा प्रकार सुरू होता, अशी कबुली या शिक्षकाने दिली आहे. दरम्यान, हे प्रकरण गंभीर असल्याने उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश माईनकर तसेच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जमावाला शांत करत या प्रकरणातील शिक्षकाला ताब्यात घेत पोलिसांनी त्याला संगमेश्वर पोलिस ठाण्यात आणले. यावेळी पोलिस ठाणे आवारातही मोठा जमाव जमला होता. घडलेल्या घटनेमुळे अनुचित प्रकार व कोणताही उद्रेक होऊ नये याकरिता रत्नागिरी येथून राज्य राखील दलाची जादा कुमक मागवण्यात आली होती. याप्रकरणी शुक्रवारी रात्री उशिरा त्या संशयित शिक्षकाविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १७५ (१) (१), ७५ (१), (४) व पोक्सो अधिनियम ८, ९क, १०, ११ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:57 02-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow