'नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देशाच्या अर्थव्यवस्थेचा वेग वाढणार', चंद्राबाबू नायडूंनी जाहीर केला पाठिंबा

Jun 7, 2024 - 14:20
Jun 7, 2024 - 15:29
 0
 'नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देशाच्या अर्थव्यवस्थेचा वेग वाढणार', चंद्राबाबू नायडूंनी जाहीर केला पाठिंबा

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वातील NDA ला बहुमत मिळाल्यानंतर शुक्रवारी(दि.7) दिल्लीत संसदीय पक्षाची बैठक झाली आणि त्यात सर्वांनी एकमताने नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची नेतेपदी निवड केली.

यावेळी एनडीएतील दुसऱ्या नंबरचा सर्वात मोठा पक्ष असलेल्या तेलगू देसम पक्षाचे (TDP) प्रमुख चंद्राबाबू नायडू (Chandra Babu Naidu) यांनी पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांच्या नावाला पूर्ण पाठिंबा दर्शवला. यावेळी नायडूंनी मोदी सरकारच्या गेल्या 10 वर्षातील कामगिरीचे कौतुक केले. तसेच, देश लवकरच जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

यावेळी चंद्राबाबू म्हणाले की, "गेल्या 10 वर्षांत भारतात मोठा बदल झाला असून भारतीय अर्थव्यवस्था जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयास आली आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचा हा वेग असाच सुरू राहील आणि पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारत यावेळी तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. नरेंद्र मोदीं नेतृत्वाखाली एनडीए सरकारने गेल्या 10 वर्षांत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. मोदींच्या नेतृत्वात देश जागतिक शक्तीस्थान बनला आहे."

ते पुढे म्हणतात, "मी गेली चार दशके राजकारणात आहे. आज संपूर्ण जगात देशाची शान वाढली आहे, त्याचे संपूर्ण श्रेय नरेंद्र मोदींना जाते. आज भारताकडे मोदीजींच्या रुपाने योग्य वेळी योग्य नेता आला आहे. भारतासाठी ही एक उत्तम संधी आहे, ही संधी पुन्हा येणार नाही. येत्या काही दिवसात भारत जागतिक पातळीवर आघाडीवर असेल. एनडीएच्या संसदीय पक्षाचा नेता म्हणून मोदींच्या नावाला माझा पाठिंबा आहे."

पाच वर्षे तुमच्यासोबत राहू-नितीश कुमार
यावेळी बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयू प्रमुख नितीश कुमार म्हणाले की, जेडीयूचा पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींना पूर्ण पाठिंबा आहे. आमचा पक्ष पूर्ण 5 वर्षे नरेंद्र मोदी यांच्यासोबत असेल. पुढच्या वेळी आपण जास्त बहुमत घेऊन येऊ. आज हा आनंदाचा क्षण आहे. दहा वर्षांपासून नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत आणि आता पुन्हा पंतप्रधान होत आहेत. त्यांनी सगळ्या देशाची सेवा केली आहे. आता पूर्ण विश्वास आहे की, राज्यांचे जे काही बाकी आहे ते पूर्ण करतील. आम्हाला तर वाटतंय की पुढच्या वेळी तुम्ही जेव्हा याल तेव्हा सगळेच पराभूत होतील. आम्ही सगळे तुमच्या नेतृत्वात काम करू, असे नितीश कुमार म्हणाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:23 07-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow