संगमेश्वर : गडगडी धरण पूर्ण होण्यासाठी कृती समिती पाठपुरावा करणार : संतोष घाग

Jun 12, 2024 - 13:44
 0
संगमेश्वर  :  गडगडी धरण पूर्ण होण्यासाठी कृती समिती पाठपुरावा करणार : संतोष घाग

देवरुख : 'धरण उशाला अन् कोरड घशाला' अशी अवस्था वाशी दशक्रोशी भागातील ग्रामस्थांची झाली आहे. संगमेश्वर तालुक्यातील वाशीस्थित गावातील धरण गेल्या ५० वर्षांत पूर्ण झालेले नाही. या धरणातील पाण्यामुळे २२ गावांचा पाणीप्रश्न सुटणार आहे, तरीही शासन व जलसंपदा विभाग दुर्लक्ष करत आहे. हे धरण पूर्ण होण्यासाठी कृती समिती आता पाठपुरावा करणार असल्याची माहिती संतोष घाग यांनी देवरुख येथे पत्रकार परिषद घेऊन दिली.

यावेळी आनंद पुरोहित, नारायण सावंत, मनोहर घाग, अविनाश घाग, जलनायक युयुत्सू आर्ते आदींसह वाशी दशक्रोशीतील नागरिक उपस्थित होते. गडगडी धरणाला तत्कालीन आमदार भाई सावंत, जगन्नाथराव जाधव असताना सुरुवात झाली. बाव जलविद्युत प्रकल्प बासनात गुंडाळल्यानंतर गडगडी धरणाला मंजुरी मिळाली. निधी मंजूर झाला व आराखड्याप्रमाणे कामही सुरू झाले. वारंवार खर्चाचे बजेट वाढवले गेले तरीही ५० वर्षात धरण काही झाले नाही. मग हा जनतेचा पैसा कुठे गेला असा प्रश्न नागरिक विचारत आहेत असेही घाग यांनी सांगितले. आता धरणासाठी तिसरी पिढी झटत आहे. चौथी पिढी पाणी पाणीं करत आहे. या धरणासाठी दशक्रोशीतील नागरिक एकत्र आले आहेत. जलसंपदा व शासनाच्या विरोधात आंदोलन छेडण्याची कृती समितीने तयारी केली होती. मात्र, जलसंपदा विभागाने दोन महिन्यात पाहणी करून कामाला सुरुवात होईल, असे आश्वासन दिल्याने हे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.

तरीही धरण पूर्ण करून घेणारच असा निर्धार कृती समितीने केला आहे. धरणाची उंची न वाढवता गाळ उपसा करावा, कालव्याऐवजी पाईपलाईन टाकून पाणीपुरवठा करावा, यासाठी जॅकवेल बांधावी, विस्थापितांसाठी स्वतंत्र ग्रामपंचायत करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:12 PM 12/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow