रत्नागिरी : खानू येथे चारसूत्री भात लागवडीचे प्रात्यक्षिक

Jun 29, 2024 - 14:42
Jun 29, 2024 - 14:51
 0
रत्नागिरी : खानू येथे चारसूत्री भात लागवडीचे प्रात्यक्षिक

पावस : गेले चार दिवस समाधानकारक पाऊस पडत असल्यामुळे जिल्ह्यात भात लावणीच्या कामांना वेग आला आहे. सुरुवातीच्या टप्प्यातील भातरोपे लावणीयोग्य झाली आहेत. शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीने भात लागवड करता यावी यासाठी कृषी विभागाने कंबर कसली असून, चारसूत्री लागवड, जमीन लागवडीसाठी तयार करताना यांत्रिकीकरणाचा वापर आणि खतांचा योग्यवेळी डोस देण्याचे तंत्र याविषयी शेतकऱ्यांना ठिकठिकाणी मार्गदर्शन केले जात आहे.

जिल्ह्यात १ जूनपासून आतापर्यंत सरासरी साडेसातशे मिमी पाऊस झाला आहे. दुसऱ्या पंधरवड्याच्या सुरुवातीला पावसाने उघडीप घेतली होती. त्यामुळे भातलावणीत व्यत्यय येईल, अशी भीती व्यक्त केली जात होती. मात्र, काही कालावधीतच पुन्हा पाऊस सुरू झाल्यामुळे बळीराजाला दिलासा मिळाला आहे. रत्नागिरी तालुक्यातील खानू येथे लावणीची लगबग चालू झाली आहे. तेथील शेतकऱ्यांना चारसूत्री भात लागवडीची माहिती देण्यासाठी कृषी विभागाकडून प्रात्यक्षिक घेण्यात आले. जालिंदर पांगरे म्हणाले, भाताच्या तुसाची काळी राख रोपवाटिकेत बी पेरण्यापूर्वी मिसळावी आणि पहिल्या नांगरणीवेळी हेक्टरी अंदाजे दोन टन भाताचा पेंढा लावणीपूर्वी शेतात गाढावा. त्यामुळे पालाश २० ते २५ किलो आणि सिलिका १२० किलो उपलब्ध होते.  

रोपे कणखर होऊन खोडकिडीला प्रतिकार करण्याची क्षमता वाढते. प्रतिगुंठा गिरीपुष्प (ग्लिरिसिडीया) झाडाची ३० किलो पाने चिखलणीपूर्वी सात ते आठ दिवस अगोदर पसरावीत. भातरोपांना सेंद्रिय खत हेक्टरी १० ते १५ किलो उपलब्ध होते. तसेच उंदरांचा प्रादुर्भाव कमी होतो. नियंत्रित लावणी करावयाच्या सुधारित दोरीवर २५ से. मी. व १५ सें. मी. आलटून अंतरावर खुणा कराव्यात. सुधारित लावणी दोरीवर १५ सें. मी. अंतरावर असलेला चूड लावावा त्यानंतर अंदाजाने १५ सें. मी. पुढे आणखी तिसरा व चौथा चूड लावावा. अशाप्रकारे एकावेळी जोड-ओळ पद्धत वापरून त्याच दोरीत लावणीचे काम पूर्ण करावे खाचरात १५ बाय १५ सें. मी. चुडांचे चौकोन व २५ सें. मी. चालण्याचे रस्ते तयार होतात.

युरिया-डीएपी ब्रिकेटचा वापर
नियंत्रित लावणीनंतर त्याच दिवशी प्रत्येक चार चुडांच्या चौकोनात मधोमध सरासरी २.७ ग्रॅम वजनाची (युरिया-डीएपी) एक ब्रिकेट (खताची गोळी) हाताने ७-१० सें.मी. खोल खोचावी. एक गुंठे क्षेत्रासाठी ६२५ ब्रिकेट (१.७५ कि.ग्रॅ.) लागतात, अधिक माहितीसाठी कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक मंडळ, कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन अमोल सकपाळ यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:10 PM 29/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow