रत्नागिरी : सामान्य ग्राहकांना तुर्तास स्मार्ट मीटर नाहीत

Jun 29, 2024 - 17:28
 0
रत्नागिरी : सामान्य ग्राहकांना तुर्तास स्मार्ट मीटर नाहीत

रत्नागिरी : सुधारित वितरण क्षेत्र योजनेंतर्गत (आरडीएसएस) महावितरणतर्फे स्मार्ट मीटर बसवण्यात येणार आहेत; परंतु यातून सर्वसामान्य ग्राहकांची सध्यातरी सुटका झाली आहे.

सध्या सामान्य ग्राहकांना प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्यात येणार नाही, असे महावितरण कंपनीने कळवले आहे. वितरण व्यवस्था सुधारण्यासाठी पहिल्या टप्प्यात सर्व फिडर, ट्रान्सफॉर्मर, सर्व शासकीय कार्यालयामध्ये स्मार्ट मीटर बसवण्यात येणार आहेत.

केंद्र शासनाची पुनर्गठित वितरण क्षेत्र योजना (आरडीएसएस) जिल्ह्यासाठी मंजूर झाली आहे. ६९६ कोटीचा हा प्रकल्प आहे. या योजनेअंतर्गत महावितरणच्या वितरण व्यवस्थेमध्ये आमुलाग्र सुधारणा होणार आहे. अनेक त्रुटी दूर करून ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्याच्यादृष्टीने योजना राबवली जाणार आहे. नुकतीच या योजनेला मंजुरी मिळाली आहे.

या योजनेमध्येच स्मार्ट मीटरचा समावेश आहे. जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर त्याचा वापर सुरू झाला आहे. जिल्ह्यासाठीही ही स्मार्ट मीटर आरडीएसएस योजनेअंतर्गत मंजूर झाले आहेत; परंतु पहिल्या टप्प्यात हे मीटर २८४ फिडर आणि ७ हजार ट्रान्सफॉर्मरवर स्मार्ट मीटर बसवण्यात येणार आहेत. त्यानंतर जिल्ह्यातील ५ लाख ८० हजार ग्राहकांची जुने मीटर बदलून स्मार्ट मीटर बसवण्याचे काम हाती घेतले जाणार होते; परंतु तुर्तास तरी सामान्य ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर बसवण्यात येणार नाहीत, अशी माहिती महावितरण कंपनीने दिली आहे.

महावितरणतर्फे स्मार्ट मीटर बसवण्याच्या योजनेत उपकेंद्रामधील सर्व फिडरवर तसेच वितरण ट्रान्सफॉर्मर आणि सर्व सरकारी कार्यालयांमध्ये स्मार्ट मीटर बसवण्यात येत आहेत. सर्वसामान्य ग्राहकांना मात्र प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्यात येणार नाहीत. आरडीएसएस या योजनेमध्ये वाहिन्यांचे विलगीकरण, वितरण हानी कमी करणे, वितरण प्रणालीचे सक्षमीकरण आणि स्मार्ट मिटरिंग यांसारखे कार्यक्रम हाती घेतले आहेत. यामुळे महाराष्ट्रातील ग्राहकांना विश्वासार्ह आणि दर्जेदार वीजपुरवठा होण्यास मदत होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:56 29-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow