खेड रेल्वेस्थानक परिसरातील कामांमुळे वाहतूक कोंडी

Jun 19, 2024 - 09:57
Jun 19, 2024 - 09:59
 0
खेड रेल्वेस्थानक परिसरातील कामांमुळे वाहतूक कोंडी

खेड : तालुक्यातील वेरळ येथे असलेल्या खेड रेल्वेस्थानक परिसराचा कायापालट करण्याच्या दृष्टीने युद्धपातळीवर काम सुरू आहे. रस्ता काँक्रिटीकरणासह अंतर्गत कामांनी वेग घेतला असून, लवकरच सुशोभिकरण देखील करण्यात येणार आहे. मात्र या कामांमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. विशेषतः रिक्षा व्यावसायिकांची डोकेदुखी कमालीची वाढली आहे.

रेल्वेस्थानक परिसरात गेल्या महिनाभरापासून रस्ते काँक्रिटीकरणासह अंतर्गत कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. यापूर्वीचा निमुळता रस्ता पूर्णपणे उखडून त्याठिकाणी दुपदरी कॉंक्रिटीकरणाचा रस्ता बनवण्यात आला आहे. यातील एक लेन पूर्ण झाली असून, दुसऱ्या लेनचे काम देखील अंतिम टप्प्यात आले आहे. रेल्वे स्थानक परिसरातही कॉक्रिटीकरण करण्यात येत आहे. या कॉक्रिटीकरणाच्या कामामुळे रिक्षासह अन्य वाहने उभी करायची कुठे, असा प्रश्न वाहनचालकांसमोर उभा ठाकला आहे. याशिवाय मध्यवर्ती ठिकाणी वाळूसह खडीचे ढिगारे देखील आहेत. याच ठिकाणाहून दोन्ही दिशांना वाहनांसाठी ये-जा करण्याकरिता मार्ग काढले आहेत. मात्र याठिकाणी चिखलाच्या साम्राज्यामुळे वाहने हाकताना वाहनचालकांना विशेषतः दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरूनचं मार्गस्थ व्हावे लागत आहे. याशिवाय परिसरात रिक्षा कुठेही उभ्या केल्या जात असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्नही जटील बनला आहे.

काँक्रिटीकरणातील सळ्या बाहेरच...
या मार्गावर दुपदरीकरणाचे काम झाले असले तरी कॉक्रिटीकरणाच्या सळ्या अजूनही बाहेरच आहेत. यामुळे वाहतुकीस धोका निर्माण होण्याची दाट शक्यता असून रात्रीच्या सुमारास या सळ्यांचा अंदाज येत नसल्याने अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाने याठिकाणी कोणत्याही प्रकारचे दिशादर्शक फलक लावण्याची तसदी अद्याप घेतलेली नाही. यामुळे वाहनचालकांची फसगत देखील होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:24 AM 19/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow