अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांना कोरोनाची लागण

Jul 18, 2024 - 10:18
 0
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांना कोरोनाची लागण

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांना कोरोनाची लागण झाली आहे. व्हाईट हाऊसने याबाबत माहिती दिली. बायडेन यांच्यामध्ये कोरोनाची सौम्य लक्षणं दिसून आली आहेत. "बायडेन डेलवेअरला परत येत आहे, जिथे ते सेल्फ आयसोलेट होतील आणि आपलं काम सुरू ठेवतील" असं अधिकृत निवेदनात म्हटलं आहे.

बायडेन यांची बुधवारी (१७ जुलै) कोरोना चाचणी झाली. याच्या एक दिवस आधी त्यांनी लास वेगास येथील नॅशनल कन्वेन्शनमध्ये भाग घेतला होता.

लास वेगासमध्ये झालेल्या या निवडणूक रॅलीत बायडेन यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ट्रम्प यांच्या कार्यकाळात बनवलेल्या धोरणांचा आणि देशातील वाढत्या हिंसाचाराचा त्यांनी निषेध केला. व्हाईट हाऊसने म्हटलं आहे की अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचं पूर्णपणे लसीकरण झालं आहे आणि त्यांना कोविड -19 चा बूस्टर डोस देखील मिळाला आहे. यानंतरही त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र त्यांची लक्षणं खूपच सौम्य आहेत.

ज्यो बायडेन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर याबाबत माहिती दिली असून त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं म्हटलं आहे. ते म्हणाले, "मला कोरोनाची लागण झाली आहे, परंतु मला बरं वाटत आहे आणि सर्व हितचिंतकांचे आभार. या आजारातून बरं होत असताना मी स्वतःला आयसोलेट करेन आणि या काळात मी अमेरिकन लोकांसाठी काम करणं सुरू ठेवेन."

राष्ट्राध्यक्षांच्या डॉक्टरांनी खुलासा केला आहे की, बायडेन यांना श्वसनासंबंधित लक्षणं आहेत. "दिवसाच्या पहिल्या कार्यक्रमापर्यंत त्यांना बरं वाटत होतं, परंतु नंतर त्यांची प्रकृती बिघडू लागली. एक कोरोना चाचणी करण्यात आली आणि ती पॉझिटिव्ह आली आहे. CDC मार्गदर्शक तत्त्वांनुसार सेल्फ आयसोलेट होतील" असं व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिव कॅरिन जीन पियरे यांनी दिलेल्या डॉक्टरांच्या एका नोटमध्ये म्हटलं आहे.
 
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:47 18-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow