राजापूर : 'उंडल' वनस्पतीचे संवर्धन करण्याचे आवाहन

Jul 18, 2024 - 17:05
 0
राजापूर : 'उंडल' वनस्पतीचे संवर्धन करण्याचे  आवाहन

राजापूर : सागरी किनारपट्टी भागातील कांदळवनाप्रमाणेच 'उंडल' ही बहुपयोगी वनस्पती असून, ती दुर्मिळ होत आहे. या वृक्षाचे जतन आणि संवर्धनाची नितांत गरज आहे. शासनाने कांदळवनाप्रमाणेच उंडल या वृक्षाच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन पंचक्रोशी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विलास चेऊलकर यांनी केले, त्यांनी या वृक्षाच्या संवर्धनासाठी आंदोलन करण्याची तयारी ठेवण्याचे आवाहन केले.

सागरी महामार्गावरील चिरेखाणफाटा ते जैतापूरपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्याचा ज्येष्ठ नागरिक संघाचा मानस असून त्याचा प्रारंभ आषाढी एकादशीचे औचित्य साधून चिरेखाणफाटा येथे वृक्षारोपण करून करण्यात आला. तालुक्यातील मिठगवाणे परिसरातील ज्येष्ठ नागरिक संघाने आषाढी एकादशी वेगळ्या पद्धतीने साजरी केली. या वेळी संस्था उपाध्यक्ष एकनाथ आडिवरेकर, मिठगवाणे सरपंच साक्षी जैतापकर, साखर हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक आनंदा मोरे, ज्येष्ठ नागरिक श्रीधर पावसकर, संस्था सचिव रमेश राणे, पोलिसपाटील गजानन भोगले आदी उपस्थित होते. वृक्षारोपणासाठी सामाजिक वनीकरण विभागाने विविध वृक्ष उपलब्ध करून दिल्याबद्दल संस्थेच्यावतीने आभार मानण्यात आले.

नारळासारखे बहुपयोगी झाड
समुद्रकिनाऱ्याजवळची जमीन ही वालुकामय (पुळणीची) असते. या जमिनीत काही ठराविक वनस्पतीच जगतात आणि वाढतात. तिवर, सुरू, माड, रूई या त्यातल्या प्रमुख. यातील आणखी एक प्रमुख वनस्पती म्हणजे 'उंडिल' अथवा 'उंडल.' भारताच्या पूर्व आणि पश्चिम किनाऱ्यावर आढळणारी ही वनस्पती आजही ग्रामीण लोकजीवनाचा महत्वाचा भाग आहे. नारळासारखंच हे एक बहुपयोगी झाड. हे एक सदाहरित वृक्ष आहे. फणसाच्या पानाच्या आकाराची याची पानं गर्दहिरवी असतात.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:29 PM 18/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow