आरक्षणावरून परिस्थिती चिघळवण्याचा प्रयत्न : प्रकाश आंबेडकर

Jul 27, 2024 - 10:51
Jul 27, 2024 - 11:51
 0
आरक्षणावरून परिस्थिती चिघळवण्याचा प्रयत्न : प्रकाश आंबेडकर

कोल्हापूर : सत्ता कोणाची येणार हे सांगता येणार नाही, मात्र येत्या निवडणुकीत सत्तापालट होणार हे नक्की, असे मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी व्यक्त केले.

सत्तेत येण्यासाठी काही पक्षाचे नेते राज्याऐवजी जात आणि समाजाचा विचार करत आहेत. राजकीय पक्षाकडून आरक्षणाचे राजकारण केले जात असून विधानसभेच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती चिघळवली जात असल्याचा आराेपही आंबेडकर यांनी केला.

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर शुक्रवारी आरक्षण बचाव यात्रेच्या निमित्ताने कोल्हापुरात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंदोलन सुरू केले. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत केवळ बहुजन वंचित आघाडीनेच भूमिका मांडली. या बैठकीला अनेक पक्षांचे नेते अनुपस्थित हाेते. या प्रश्नावरून राज्यातील वातावरण गढूळ आणि विभक्त झाले आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप हे राजकीय पक्ष आरक्षणाबाबत कोणतीही भूमिका घेत नाहीत. या आंदोलनाकडे ते कोंबड्याच्या झुंजी म्हणून पाहात असल्याचाही आरोप आंबेडकर यांनी केला. गरीब आणि सामान्य मराठ्यांना या आरक्षणाच्या आंदोलनात फसवले जात आहे, निझामी मराठे हे रयतेच्या मराठ्यांना स्वीकारत नाहीत. आरक्षणाची वस्तुस्थिती लोकांना समजावी यासाठीच ही यात्रा काढत आहोत, असे आंबेडकर म्हणाले.

भाजप आणि उध्दवसेनेचे नेतृत्व ब्राह्मण कायस्थ व्यक्तीकडे आहे. त्यामुळे ते ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या मागण्यांबाबतीत उदासीन आहेत तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष मराठा समाजाचे आहेत, असा शिक्का बसलेला आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी तर ३१ मराठा कुणबी खासदार निवडून आणलेत, आता विधानसभेत २२५ समाजाचे आमदार निवडून आणू, असे विधान केले होते. त्यामुळे आरक्षणाच्या मुद्यावर महाराष्ट्रातील परिस्थिती चिघळवण्याचा डाव असल्याचे चित्र आहे. नंतर त्यांनी सारवासारव केली असली तरी जो संदेश त्यांना द्यायचा होता, तो दिला आहे, म्हणून आम्ही या आरक्षण बचाव यात्रेतून शांततेचा संदेश देत आहोत, असे आंबेडकर म्हणाले.

ओबीसींचे १०० आमदार निवडून यावेत

निवडणुकीत ओबीसी समाजाचे १०० आमदार निवडून आले पाहिजेत. आरक्षण बचाव यात्रा शांततेसाठी काढत आहोत. याचा फायदा निवडणुकीतही होईल. आमचा तबला दोन्ही बाजूने वाजेल, असे आंबेडकर म्हणाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:20 27-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow