चिपळूण : डीबीजेच्या आवारात पुन्हा दुर्घटना घडू नये, यासाठी खबरदारी घ्या; मनसेची मागणी

Jul 18, 2024 - 11:39
Jul 18, 2024 - 15:40
 0
चिपळूण : डीबीजेच्या आवारात पुन्हा दुर्घटना घडू नये, यासाठी खबरदारी घ्या; मनसेची मागणी

चिपळूण : येथील डीबीजे महाविद्यालयाजवळ चिऱ्याचा कठडा कोसळून त्यात चिरडलेल्या विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यूच्या प्रकाराची मनसेने दखल घेत राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला आणि भविष्यात बांधकाम विभागाला खडे बोल सुनावले. मनसेचे प्रदेश सरचिटणीस व खेडचे माजी नगरसेवक वैभव खेडेकर, जिल्हा सचिव संतोष नलावडे यांच्यासह मनसे पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करून विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयाला सहकार्य करावे आणि भविष्यात अशी घटना घडू नये, यासाठी खबरदारी घ्यावी, असे निवेदन दिले.

मुंबई-गोवा महामार्गापासून उंचीवर डीबीजे महाविद्यालय असल्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने महाविद्यालयाच्या आवारात मोठ्या लांबीची आरसीसी संरक्षक भिंत उभारली आहे. त्या भिंतीवर जांभा दगडाचा संरक्षक कठडा बांधण्यात आला. शुक्रवारी मुसळधार पावसामुळे या कठड्याचा भाग महामार्गवरील गटारावर कोसळला. त्या ठिकाणी उभा असलेला सिद्धांत प्रदीप घाणेकर भिंतीखाली गाडला गेला. त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी मनसेचे नेते वैभव खेडेकर, जिल्हा सचिव संतोष नलावडे आदींनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर डीबीजे महाविद्यालयाचे चेअरमन मंगेश तांबे, संचालक सुचय रेडीज, नीलेश भुरण यांच्याशी या घटनेबाबत चर्चा करून निवेदन दिले. त्यानुसार घाणेकर कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी, तसेच भविष्यात अशी कोणती दुर्दैवी घटना घडू नये यासाठी योग्य खबरदारी घ्यावी, अशी मागणी केली आहे. 

तसेच राष्ट्रीय महामार्ग उपयोगाच्या कार्यालयात धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला आणि भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी लक्ष द्या अशी सूचना केली. या वेळी मनसे शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष उमेश लटके, तालुका सचिव संदेश साळवी, माजी शहराध्यक्ष विद्यार्थी सेना गुरु पाटील, विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष सागर कदम, विद्यार्थी सेना तालुका सचिव सोहम पाथरे, विद्यार्थी सेना उपजिल्हाध्यक्ष गुरुनाथ नागे, उत्कर्ष खानोलकर, अविनाश सिंग आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:06 PM 18/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow