निर्दोष सॅन्ड्रा ४३ वर्षांनी तुरुंगाबाहेर!

Jul 23, 2024 - 10:57
Jul 23, 2024 - 16:58
 0
निर्दोष सॅन्ड्रा ४३ वर्षांनी तुरुंगाबाहेर!

१९८० सालच्या नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेच्या मिसौरी राज्यातील सेंट जोसेफ या ठिकाणी लायब्ररीमध्ये काम करणाऱ्या पॅट्रिशिया जेष्क नावाच्या एका महिलेचा खून झाला. या खुनासाठी त्यावेळी २० वर्षं वय असलेल्या सॅन्ड्रा हेम या तरुण मुलीला अटक करण्यात आली.

तिने त्यावेळी या गुन्ह्याची कबुली दिली अशी नोंद करण्यात आली आणि तिला त्या खुनासाठी आजन्म कारावासाची शिक्षाही झाली. उरलेलं जग आपापल्या मार्गाने चालू लागलं आणि सॅन्ड्रा हेमबद्दल विसरूनही गेलं. पण आज ४३ वर्षांनंतर तिचं नाव पुन्हा अमेरिकेत गाजू लागलं. कारण सॅन्ड्रा हेम संपूर्णतः निर्दोष होती, तरीही तिला शिक्षा देण्यात आली होती.

अमेरिकेत काम करणाऱ्या 'द इनोसन्स प्रोजेक्ट' नावाच्या संस्थेने सॅन्ड्रा हेमच्या केसमध्ये लक्ष घातलं तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं, की सॅन्ड्राला दोषी ठरविण्यासाठी कोर्टासमोर केवळ एकच पुरावा होता आणि तो म्हणजे तिचा स्वतःचा कबुलीजबाब. पण तिच्या कबुलीजबाबाला बळ पुरविणारा एकही पुरावा कोर्टासमोर नव्हता. इतकंच नाही, तर सॅन्ड्राचा स्वतःचा कबुलीजबाबदेखील अत्यंत तुटक आणि स्वतःच्याच म्हणण्याशी विसंगत ठरेल असा होता. शिवाय, हा जबाब देतेवेळी सॅन्ड्राची शारीरिक अवस्थादेखील चांगली नव्हती. ती पूर्ण वेळ मान खाली घालून उभी होती आणि सगळा वेळ तोंडातल्या तोंडात पुटपुटत बोलत होती. तिला त्यावेळी अतिशय वेदना होत होत्या. तिला त्यावेळी मानसिक आजारावरची औषधं दिलेली होती. कोर्टात कबुलीजबाब देतेवेळी सॅन्ड्रा या औषधाच्या प्रभावाखाली होती, तिला खूप वेदना होत होत्या, ती त्या औषधांमुळे अर्धवट गुंगीतही होती आणि आपण काय करतोय किंवा काय बोलतोय याची तिला जाणीव नव्हती. मात्र, तरीही त्यावेळी तिचा कबुलीजबाब ग्राह्य धरला गेला.

मग त्यावेळच्या तिच्या वकिलांनी त्याविरुद्ध काही आवाज का उठवला नाही? तिचं निरपराधीत्व सिद्ध करण्यासाठी कुठले पुरावे का दिले नाहीत? त्यांच्याकडे तसे काही पुरावे नव्हते का? तर तिच्या वकिलांकडे ती निरपराध असण्याचे पुरावे नव्हते. कारण सेंट जोसेफ इथल्या पोलिस खात्याने त्यावेळी त्यांच्याकडची माहिती लपवून ठेवली. १४ जून २०२४ रोजी पूर्वीच्या कोर्टाचा निर्णय सर्किट कोर्टाने उलट फिरवला आणि सॅन्ड्राला निरपराध मानून सोडून देण्याचे आदेश दिले. हे आदेश देण्यापूर्वी कोर्टाने त्या खटल्याचं पुनरावलोकन केलं तेव्हा त्यांना अनेक धक्कादायक बाबी समजल्या.

त्यात कोर्टाला असं आढळून आलं, की हा खून झाला त्यावेळी संशयाची सुई खरं म्हणजे सेंट जोसेफ इथल्या पोलिस खात्यात काम करणाऱ्या मायकेल हॉलमन नावाच्या अधिकाऱ्याकडे निर्देश करत होती. ज्यावेळी पॅट्रिशियाचा खून झाला त्यावेळी हॉलमनचा ट्रक त्या भागात बघितला गेला होता. त्याने मात्र तो त्यावेळी दुसऱ्या ठिकाणी असल्याची बतावणी केली होती. मात्र, त्याने जे दुसरं ठिकाण सांगितलं, त्यावेळी तो त्या ठिकाणी असल्याचं सिद्ध करू शकला नव्हता.
हॉलमनने असा दावा केला की त्याला पॅट्रिशियाचं क्रेडिट कार्ड एका खड्ड्यात सापडलं. पण ते सापडल्यानंतर एक पोलिस अधिकारी म्हणून तिला ते इमानदारीत परत न देता त्याने ते चक्क वापरलं होतं. आणि हे सगळं कमी म्हणून की काय, त्यावेळी हॉलमनच्या घरात सापडलेल्या कानातल्यांची एक वैशिष्ट्यपूर्ण डिझाईनची जोडी पॅट्रिशियाच्या वडिलांनी पॅट्रिशियाची असल्याचं ओळखलंही होतं.

मात्र, यापैकी कुठल्याही गोष्टीची माहिती त्यावेळी सॅन्ड्राच्या वकिलांना देण्यात आली नाही. निरपराध सॅन्ड्रा तुरुंगात गेली आणि हे कृत्य करणारा पोलिस अधिकारी मायकेल हॉलमन त्यानंतर दुसऱ्या एका गुन्ह्यासाठी तुरुंगात गेला आणि त्याचा २०१५ साली मृत्यूही झाला. हा संपूर्ण काळ निरपराध असणारी सॅन्ड्रा तुरुंगवासाची शिक्षा भोगत होती. तिचा कबुलीजबाब घेण्यापूर्वी पोलिसांनी तिची अनेक वेळा कसून चौकशी केली आणि तिला मानसिक आजारासाठीची औषधंही दिली. सॅन्ड्रा वयाच्या १२ वर्षांपासून कारणा कारणाने मानसिक आरोग्यासाठीची औषधं घेत होती त्यामुळे ही औषधंही तिला सहज दिली गेली.

निरपराध सर्वाधिक काळ तुरुंगात!
केवळ नशिबाने 'द इनोसन्स प्रोजेक्ट'च्या लोकांनी सॅन्ड्राला मदत केली आणि कुठलीही चूक नसताना ४३ वर्षांचा तुरुंगवास भोगून सॅन्ड्रा हेम वयाच्या ६३ व्या वर्षी तुरुंगातून बाहेर आली. संपूर्णपणे निरपराध असतांना सगळ्यात प्रदीर्घ तुरुंगवास भोगलेली व्यक्ती म्हणून अमेरिकेच्या इतिहासात तिची नोंद केली जाईल. बाहेर आल्यावर तिला तिची मुलगी आणि नात भेटल्या. पण सगळ्या काळात शासकीय यंत्रणेनं तिच्याकडून तिचं संपूर्ण आयुष्यच हिरावून घेतलं, ते तिला कसं परत मिळणार हा खरा प्रश्न आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:41 23-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow