वादळी वाऱ्याने गुहागरमध्ये मोठे नुकसान

Jul 27, 2024 - 11:17
Jul 27, 2024 - 12:19
 0
वादळी वाऱ्याने गुहागरमध्ये मोठे नुकसान

गुहागर : वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसाने संपूर्ण गुहागर तालुक्याला झोडपून काढले आहे. या वादळी वाऱ्याचा फटका घरे, गोठे आणि झाडांना बसला आहे. यामुळे मोठे नुकसान झाले आहे. गुहागर नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाकडूनही नुकसान किंवा आपत्तीनंतर त्वरित कार्यवाही केली जात असल्याने नागरिकांनाही दिलासा मिळत आहे.

वरचापाटतर्फे गुहागर येथील अमिता आनंद खरे यांचे गोठ्याचे छत कोसळून त्यांचे सुमारे २५ हजाराचे नुकसान झाले आहे. खोडदे येथील अभिजित शिवराम साळवी यांचे पराचे सुमारे २५ हजार ५०० रकमेचे, सुरळ येथील आनंदी घोडू जडधाळ यांचा अतिवृष्टीने गोठ्याचे १४ हजार ३०० रुपयांचे, अनिता चंद्रकांत चव्हाण यांच्या गोठ्याचे ४ हजाराचे नुकसान झाले आहे. आरे येथील माधुरी श्रीनिवास भोसले यांचे घराच्या पडवीचे छत कोसळून १५ हजाराचे, अहुर येथील दीपक प्रकाश जाधव याच्या राहत्या घरावर आंब्याचे झाड पडून घराचे अंदाजे १८ हजार १०० रुपयांचे नुकसान झाले आहे. लिटिल चॅम्प इंग्लिश मीडियम स्कूत जानवळ येथे शाळेचा बांध कोसातून १६ हजार रुपयांचे, वेळंब वचनवाडीमधील निर्मला नारायण पोसरेकर यांच्या घराचे पत्रे उडून ३ हजाराचे नुकसान झाले. वेळंब कातळवाडीमधील निर्मला राणे यांच्या घराचे पत्रे उडून २ हजाराचे, नम्रता नितीन गुरव यांच्या शौचालयाचे पत्रे उडून २ हजार ४०० रुपयांचे नुकसान झाले. आरेमधील प्रमिला प्रकाश देवकर यांच्या घराचे पत्रे उडून २५ हजाराचे नुकसान झाले असून कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. माडेवाडीतर्फे वेळंबमधील जि. प. पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा नं. २ शाळेच्या सभागृहाचे पत्रे व इमारतीचे कौले उडून ९ हजार ५०० रुपयांचे, नरवण येथील विजया दत्तात्रय नाटुरकर यांचे गोठ्यावर झाड पडल्याने ७ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. निवोशी येथील योगिता एकनाथ दणदणे याच्या घराचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले. वसंत गोपाळ धुमक याच्या घरावर फणसाचे झाड पडून १४ हजारांचे तर मारूती मंदिर येथील प्रमोद रामा भायनक याच्या घरावर नारळाचे झाड पडून २४ हजार ९०० रुपयांचे नुकसान झाले आहे.

वीजपुरवठा खंडित
गुरुवारी सकाळी साखरीआगर शाळेच्या मागच्या बाजूला दरड कोसळली. ग्रामपंचायत काताळे कार्यक्षेत्रातील तवसाळ, तवसाळ खुर्द, काताळे गावात गेले दोन दिवसांपासून वीजपुरवठा खंडित आहे. त्यांचा सार्वजनिक नळपाणी पुरवठा बंद आहे. पोमेंडी गावातील वीजपुरवठा देखील गेल्या दोन दिवसांपासून खंडित आहे.

गेली आठवडाभर धो-धो कोसळणाऱ्या पावसाने गुहागर तालुक्यातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत केले आहे. एकीकडे घरे, गोठे, बांध कोसळणे, झाडे उन्मळून पडणे आणि दरडी कोसळण्याच्या घटना घडत असताना आता सततच्या पावसामुळे व दाभोळ खाडीला आलेल्या भरतीमुळे वेलदूर नवानगर परिसरातील लोकवस्तीमध्ये गुरूवारी दुपारी पाणी शिरले. याचा फटका मच्छीमारांनी नांगरून ठेवलेल्या बोटींना बसला.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:46 PM 27/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow