सेवानिवृत्त पोलिसांचा होणार पत्नीसह सन्मान

Jul 27, 2024 - 15:38
 0
सेवानिवृत्त पोलिसांचा होणार पत्नीसह सन्मान

रत्नागिरी : 'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' हे ब्रीदवाक्य घेऊन जनतेच्या संरक्षणासाठी २४ तास ऊन-पाऊस, वादळ, वाऱ्याची तमा न बाळगता काम करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याचा सेवानिवृत्तीला अनोखा सन्मान होणार आहे. यापूर्वी पोलिस अधीक्षकांकडून बुके, भेटवस्तू दिली जात होती. परंतु आता सेवानिवृत्त होताना कर्मचाऱ्याला स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र तसेच पत्नीला साडी- चोळी देणार आहेत. 

याबाबतचे पत्र अपर पोलिस महासंचालकांकडून जिल्हा पोलिस दलाला प्राप्त झाले असून त्याची काटेकोर अंमलबजावणी केली जात आहे. जिल्हा पोलिस दलामध्ये नेहमी कोणी ना कोणी कर्मचारी सेवानिवृत्त होतात. त्यांचा महिन्याला एकत्र निरोपसमारंभ केला जातो. पोलिस कर्मचारी जनतेच्या सेवेसाठी आपले आयुष्य घालवतो. त्यामुळे त्याचा यथोचित सन्मान करून त्याला सेवानिवृत्त करावे, असा आदेश अप्पर पोलिस महासंचालकांनी नुकताच जारी केला आहे. त्याची अंमलबजावणी सुरू आहे. पोलिस कर्मचाऱ्यांच्या वाढदिवसालाही त्याला सुट्टी द्यावी, असे आहे. परंतु पोलिस कर्मचाऱ्यांवरील कर्तव्याचा ताण अधिक असल्याने स्वतःचा वाढदिवस आपल्या कुटुंबीयांबरोबर करायला त्याला वेळ नसतो.

पोलिस कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य टिकून राहावे, यासाठी अनेक उपक्रम राबविले जात आहेत. त्यानुसार सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच योग्य सन्मान करण्याबाबतचा आदेश जारी केली आहे. आता प्रत्येक महिन्याला निवृत्त होणाऱ्या पोलिस अधिकारी- कर्मचारी यांचा निरोपसमारंभावेळी स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन सन्मान केला जातो. पत्नीला साडी-चोळी भेटवस्तू देऊन दोघांना गौरविण्यात येते. पती ड्यूटीवर गेल्यानंतर कुटुंबाला सांभाळण्याचे काम पत्नी करते. तसेच कर्तव्यावर असताना पतीला धीर देण्याचे काम पत्नी करते. म्हणून पत्नीचाही सन्मान केला जातो. या कार्यक्रमला प्रमुख अधिकाऱ्यांनी उपस्थित राहणे अनिवार्य करण्यात आले आहे.

सन्मानाने निवृत्ती होणे, ही बाब प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी गौरवाची असते. सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र आणि भेटवस्तू देऊन सपत्निक गौरविण्यात यावे, असे अपर पोलिस महासंचालकांचे आदेश आहे. त्यानुसार दर महिन्याला काटेकोर पालन केले जाते.- धनंजय कुलकर्णी, जिल्हा पोलिस अधीक्षक, रत्नागिरी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:07 PM 27/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow