Breaking : 25 जून संविधान हत्या दिवस म्हणून घोषित

Jul 12, 2024 - 16:18
 0
Breaking : 25 जून संविधान हत्या दिवस म्हणून घोषित

नवी दिल्ली : तिसऱ्यांदा सत्तेत आलेल्या भाजप सरकारने मोठा निर्णय घेत 25 जून हा दिवस 'संविधान हत्या दिवस' म्हणून घोषित केला आहे. याबाबत केंद्र सरकारकडून अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

गृहमंत्री अमित शाह यांनी सोशल मीडियावर अधिसूचना पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. 25 जून 1975 रोजी देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती.

गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, 25 जून 1975 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आपली हुकूमशाही मानसिकता दाखवत देशात आणीबाणी लादत भारतीय लोकशाहीचा गळा घोटला होता. लाखो लोकांना विनाकारण तुरुंगात टाकले आणि माध्यमांचा आवाज दाबला होता. भारत सरकारने दरवर्षी 25 जून हा दिवस 'संविधान हत्या दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. हा दिवस 1975 च्या आणीबाणीच्या अमानुष वेदना सहन करणाऱ्या सर्वांच्या अतुलनीय योगदानाचे स्मरण करेल.

25 जून 1975 : इंदिरा गांधींकडून देशभरात आणीबाणी जाहीर

इतिहासात 25 जून हा दिवस भारताच्या दृष्टीने महत्त्वाच्या घटनेचा साक्षीदार आहे. 25 जून 1975 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यामार्फत देशात आणीबाणीची घोषणा करण्यात आली होती, ज्याने अनेक ऐतिहासिक घटनांना जन्म दिला. इंदिरा गांधी यांनी सरकार आणि सत्तेविरोधात आवाज उठवणाऱ्या हजारो लोकांना जेलमध्ये टाकलं होतं. 26 जून 1975 पासून 21 जून 1977 या 21 महिन्यांच्या कालावधीत भारतात आणीबाणी होती. आणीबाणीच्या काळात लोकसभा निवडणूकही स्थगित केली होती. इंदिरा सरकारविरुद्ध संघर्षाचं बिगुल वाजवणारे लोकनायक जयप्रकाश नारायण आणि मोरारजी देसाई यांसारखे नेते, तसंच सरकारची टीका करणारे पत्रकार, समाजसेवक, विविध संघटनांचे लोक आणि विद्यार्थी यांची रवानगी तुरुंगात केली होती. वृत्तपत्रांना सरकारविरोधात काहीही प्रकाशित करण्यास मज्जाव घालण्यात आला होता आणि जर कोणी हिंमत केली तर त्यांच्यावर सेन्सॉरशिप लादली गेली. राजकीय महत्त्वाकांक्षा आणि सत्ता जाण्याच्या भीतीने इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी जाहीर केल्याचं म्हटलं जातं. जयप्रकाश नारायण, अटल बिहारी वाजपेयी, राजनारायण यांसारखे अनेक नेते इंदिरा गांधी यांच्या धोरणांचे मुख्य विरोधक होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:46 12-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow