चिपळूण महामार्गाजवळील अतिक्रमणांमध्ये वाढ

Jul 16, 2024 - 11:17
Jul 16, 2024 - 14:24
 0
चिपळूण महामार्गाजवळील अतिक्रमणांमध्ये वाढ

चिपळूण : मुंबई-गोवा आणि चिपळूण-कराड महामार्ग अनधिकृत टपऱ्या, शेड, खोक्यांच्या जाळ्यात अडकला आहे. महामार्गालगत दुतर्फा मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे वाढली असून राष्ट्रीय महामार्ग विभाग फक्त अतिक्रमणे हटवणार, असे नोटिशीद्वारे नुसते इशारे देत आहे. प्रत्यक्षात मात्र अतिक्रमणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. पोफळीपर्यंत दोन्ही राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे उभी राहिली आहेत. ठिकठिकाणी चायनीज, वडापावच्या गाड्या, हॉटेल, टपऱ्या, खोकी, विविध प्रकारची दुकाने थाटण्यात आली आहेत. या ठिकाणी बेकायदेशीर उद्योग सुरू आहेत. या टपऱ्यांवर मटका, जुगार चालवला जात आहे तसेच अनेक ठिकाणच्या टपऱ्यांमध्ये गुटखा, गांजा सापडला आहे. पोलिसांनी अशा टपऱ्यांवर काहीकाळ कारवाईदेखील केली आहे; मात्र राष्ट्रीय महामार्ग विभागाने ही अतिक्रमणे काढण्याची नोटीस देऊन फक्त इशारेच दिले आहेत. महामार्गालगत अनेक ठिकाणी चायनिजच्या गाड्या व शेडमध्ये दुकाने थाटली आहे. अनेकवेळा नागरिकांच्या तक्रारी होऊनदेखील राष्ट्रीय महामार्ग विभाग कानाडोळा करीत आहे. परिणामी, टपरीच्या आडोशाला गेलेल्या सिद्धांतचा मृत्यू झाला आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील सावर्डे, कापसाळ, पागनाका, पॉवरहाउस, शिवाजीनगर, बहादूरशेखनाका, कळंबस्ते फाटा, फरशीतिठा, वालोपे या भागात मोठ्या प्रमाणात रस्त्यालगत अतिक्रमणे वाढली आहेत. त्याचबरोबर कराड मार्गावर मिरजोळी, कोंढे, खेर्डी सती, पिंपळी या भागात रस्त्यालगत अतिक्रमणे झाली आहेत; मात्र त्यावर राष्ट्रीय महामार्ग विभागाने अंकुश ठेवलेला नाही. त्यामुळे दिवसेंदिवस अतिक्रमणात वाढ होत होते. सहा महिन्यापूर्वी खेर्डी येथे एका तरुणाचा रस्त्यालगत असलेल्या एका भाजीच्या दुकानामुळे झालेल्या अपघातात मृत्यू झाला होता. त्यानंतर नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतल्याने राष्ट्रीय महामार्ग विभागाने खेर्डी ते सतीपर्यंतचे अतिक्रमणे काढली होती; मात्र हा अतिक्रमण हटावचा केवळ फार्स ठरला आहे कारण, आता नव्याने त्याच ठिकाणी अतिक्रमणे उभी राहिली आहेत.

डीबीजे महाविद्यालयाच्या बाहेर महामार्गालगत अनेक टपऱ्या नव्याने उभ्या राहिल्या आहेत. या टपऱ्यांमध्ये राजरोसपणे गुटखादेखील विकला जात असल्याची आहे. त्यामुळे या टपऱ्या राष्ट्रीय महामार्ग विभागाने तत्काळ काढाव्यात अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा चिपळूणकर नागरिकांनी दिला आहे.

चिपळूण तालुक्यात सावर्डेपासून परशुराम आणि गुहागरपासून
राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या टपऱ्या, खोकी, पत्राशेडधारकांना काही दिवसांपूर्वीच नोटिसा दिल्या आहेत. त्यांना खोकी, टपऱ्या हटवण्यासाठी कालावधीदेखील दिला; मात्र आता पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेण्याचे नियोजन आहे. - राजेंद्र कुलकर्णी, उपअभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग, चिपळूण


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:46 PM 16/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow