राजकारण थांबवा, जातीय सलोखा राखा : खासदार नारायण राणे

Jul 16, 2024 - 16:18
Jul 16, 2024 - 16:22
 0
राजकारण थांबवा, जातीय सलोखा राखा : खासदार नारायण राणे

मुंबई : राज्यातील काही नेत्यांकडून किरकोळ राजकीय फायद्यासाठी जाती-जातीत दुहीचे विष कालवण्याचं काम सुरू आहे, मात्र त्यामध्ये सर्वसामान्यांचा बळी जातोय, त्यामुळे राजकारण थांबवा आणि जातीय सलोखा राखा असं आवाहन भाजपचे खासदार नारायण राणे ( Narayan Rane) यांनी केलं आहे.

राज्यातील सर्व जबाबदार नेत्यांनी एकत्र यावं आणि शांतता राखण्याचा प्रयत्न करावा असंही नारायण राणे म्हणाले.

माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे खासदार नारायण राणे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये राज्यातील जाती-जातींमध्ये दुही निर्माण होत असून शांतता राखण्यासाठी सर्व नेत्यानी एकत्रित प्रयत्न करावे असं आवाहन केलं आहे.

काय म्हणाले नारायण राणे?

राजकारण थांबवा! सलोखा राखा!

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवकल्याणकारी महाराष्ट्रामध्ये सध्या जाती-जातींमध्ये द्वेषाचे विष कालवून जातीय सलोखा धोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. विविध विचारसरणीचे आणि त्यातही नव्याने पुढे आलेले काही नेते किरकोळ राजकीय फायदा नजरेसमोर ठेऊन दुहीचे आणि द्वेषाचे विष कालविण्याचे पाप करीत आहेत. सर्वसामान्यांच्या हितासाठी जाती-जातींमध्ये संघर्ष निर्माण करीत असल्याची बतावणी ही मंडळी करतात. संघर्षामध्ये शेवटी सर्वसामान्यांचे बळी जातात व नुकसान होते हे मात्र ते विसरतात.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये ऐतिहासिक काळापासून जातीय सलोख्याचे वातावरण आहे आणि गावा-गावांमध्ये लोक गुण्यागोविंद्याने नांदतात. या वातावरणाला नख लावण्याचे प्रयत्न हाणून पाडले पाहिजेत. सर्व जबाबबदार राजकीय नेत्यांनी एकत्र येऊन महाराष्ट्रातील जातीय सलोखा कायम रहावा यासाठी प्रयत्न करावेत असे मला वाटते.

अशी पोस्ट राणेंनी केली आहे.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:47 16-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow