राजापूर : अर्जुना नदीच्या मोठ्या पुलाला 'भाई हातणकर' यांचे नाव देण्याचा ठराव

Jul 17, 2024 - 10:00
Jul 17, 2024 - 10:38
 0
राजापूर : अर्जुना नदीच्या मोठ्या पुलाला 'भाई हातणकर' यांचे नाव देण्याचा ठराव

राजापूर : मुंबई-गोवा महामार्गवरील राजापूर येथील मोठ्या पुलाला माजी मंत्री कै. ल. र. तथा भाई हातणकर यांचे नाव देण्याचा ठराव जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत झाल्याची माहिती समितीचे सदस्य दीपक नागले यांनी दिली.

महामार्गावरील सर्वाधिक उंचीच्या पुलाला निःस्वार्थी, निष्कलंक आणि राजकारणातील आदर्शवत व्यक्तिमत्त्व असलेले राजापूरचे पहिले राज्यमंत्री कै. ल. रं. तथा भाई हातणकर यांचे नाव द्यावे, अशी मागणी कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई शाखा राजापूरच्यावतीने पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली होती. त्यानंतर, जिल्हा नियोजन समितीच्या सभेमध्येही पुलाला भाई हातणकर यांचे नाव देण्याची मागणी केली होती.

त्याप्रमाणे महामार्गावरील अर्जुना नदीवरील पुलाला राज्यमंत्री कै. ल. रं. तथा भाई हातणकर यांचे नाव देण्याचा ठराव जिल्हा नियोजन समिती बैठकीमध्ये झाला असून, त्याची लवकरच अंमलबजावणी होणार आहे. तशी माहिती कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई शाखा राजापूरचे अध्यक्ष आणि जिल्हा नियोजन समिती सदस्य दीपक नागले यांनी दिली.

कै. हातणकर हे राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्रिपद भूषविणारे राजापूर विधानसभा मतदारसंघाचे पहिले आमदार आहेत. त्यांनी मंत्रिमंडळामध्ये एकाचवेळी आठ खात्यांचा कारभार पाहिला. त्यामध्ये सार्वजनिक बांधकाम खात्यासह महसूल खाते, पूनर्वसन खाते, सहकार खाते, मत्स्य व्यवसाय, बंदरे विकास खाते आदी खात्यांचा राज्यमंत्री म्हणून त्यांनी कारभार सांभाळला. त्यामध्ये त्यांनी आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटविताना सर्वसामान्यांच्या विकासाला न्याय देण्याला प्राधान्य दिले. विविध राजकीय पक्षांकडून राजापूर मतदारसंघाचे पाचवेळा विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व करणारे कै. भाई हातणकर यांनी त्या काळामध्ये विकासकामंसाठी अल्प निधी मिळत असतानाही मतदारसंघाच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. दूरदूरवर विखुरलेल्या गावांच्या दुर्गम पायवाटा संपुष्टात आणून गावांना रस्त्यांच्या माध्यमातून जोडण्याच्या कामाचा पाया रचण्याचे महत्त्वाचे कार्य त्यांनी केले. राजापूर तालुक्याला कोल्हापूर आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यांना रस्त्यांच्या साहाय्याने जोडण्यात त्यांचे योगदान राहिले आहे.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:48 AM 17/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow