UPSC चे अध्यक्ष मनोज सोनी यांच्या राजीनामा प्रकरणाची चौकशी करा, विजय वडेट्टीवार यांची मागणी

Jul 22, 2024 - 15:53
 0
UPSC चे अध्यक्ष मनोज सोनी यांच्या राजीनामा प्रकरणाची चौकशी करा, विजय वडेट्टीवार यांची मागणी

मुंबई - देशातील अधिकारी घडवणारी, त्यांची परीक्षा घेणारी संस्था म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोग. पण पूजा खेडकर प्रकरणामुळे या आयोगावर प्रश्नचिन्ह उभा राहिले आहे. पूजा खेडकर यांची नियुक्ती रद्द होण्याची प्रक्रिया सुरू असताना अचानक यूपीएससीचे अध्यक्ष मनोज सोनी यांच्या राजीनाम्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

पाच वर्ष शिल्लक असताना सोनी यांनी अचानक राजीनामा का दिला? हा प्रश्न जनतेला पडला आहे. त्यामुळे सत्य बाहेर येण्यासाठी पूजा खेडकर प्रकरणी मनोज सोनी यांची चौकशी झाली पाहीजे, अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रचितगड या शासकीय निवासस्थानी आज पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेत विजय वडेट्टीवार यांनी सोनी आणि यूपीएससी, नीट घोटाळ्याच्या चौकशीची मागणी केली. यावेळी विजय वडेट्टीवार म्हणाले कि, सन २०२३ मध्ये मनोज सोनी यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. गुजरात-बडोदा येथील विद्यापीठात सगळ्यात तरुण कुलगुरू म्हणून सोनी यांची नियुक्ती केली होती. तेव्हाही त्यांचा कार्यकाळ वादग्रस्त राहिला होता.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आधीच म्हटले होते की, भाजपने घटनात्मक संस्थांवर कब्जा करून त्याचे नुकसान केले आहे. पूजा खेडकर प्रकरण असो किंवा नीटचा निकाल असो हे निकाल घोषित झाल्यावर भयानक चित्र उभे राहत आहे. वर्षानुवर्ष या परीक्षांसाठी मेहनत घेणाऱ्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांवर हा अन्याय आहे. केंद्रीय संस्थेवर आज प्रश्न उपस्थित होत आहे ते केंद्रातील भाजप सरकारमुळे हे आता स्पष्ट आहे.

मनोज सोनी यांच्याआधी पी. के. जोशी हे यूपीएससीचे अध्यक्ष होते. जोशी हे पूर्वी मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष होते. त्यांच्याच कार्यकाळात व्यापम घोटाळा झाला होता. त्यानंतर ते यूपीएससीचे अध्यक्ष झाले, त्यानंतर त्यांची नियुक्ती एनटीए (National Testing Agency) चे अध्यक्ष म्हणून झाली, जी नीट परीक्षा घेते. हे सगळे पाहता यूपीएससी आणि NEET घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहीजे, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:16 22-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow