'स्वरनिनाद'तर्फे २८ जुलैला गुरुपौर्णिमा विशेष कार्यक्रम

Jul 26, 2024 - 16:22
 0
'स्वरनिनाद'तर्फे २८ जुलैला गुरुपौर्णिमा विशेष कार्यक्रम

◼️ १७५ विद्यार्थी सादर करणार कलाविष्कार 

रत्नागिरी : गेली ८० वर्षे अविरत रत्नागिरीकरांसाठी संगीत सेवा देणाऱ्या स्वरनिनाद संगीत विद्यालयाचा गुरुपौर्णिमा कार्यक्रम रविवारी (२८ जुलै) सायंकाळी ४.३० ते ८.३० यावेळेत  स्वा. सावरकर नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आला आहे. 

रत्नागिरीत सांगितिक चळवळ सुरु करण्यात स्व. विनायकबुवा रानडे, स्व. भालचंद्रबुवा रानडे आणि स्व. बाळासाहेब हिरेमठ यांचे मोलाचे योगदान आहे. स्व. विनायकबुवा रानडे आणि स्व. भालचंद्रबुवा रानडे यांनी ८० वर्षांपूर्वी या संगीत विद्यालयाची स्थापना केली. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी संगीत विद्यालयातील विद्यार्थ्यांतर्फे गुरुपौर्णिमा कार्यक्रम केला जातो. सध्या स्वरनिनाद अकादमीचे वर्ग माळनाका आणि शेरेनाका येथे सुरु आहेत. यात सुमारे २५० विद्यार्थी तबला, संवादिनी, पखवाजचे शास्त्रीय शिक्षण घेत असून, त्यांना विजय रानडे, केदार लिंगायत, मंगेश चव्हाण, सौ. प्रज्ञा काळे संगीताचे शिक्षण देत आहेत.

या कार्यक्रमाला विनायकबुवा रानडे यांचे शिष्य आणि ज्येष्ठ हार्मोनियमवादक शिरीष आचरेकर, ज्येष्ठ गुरु आणि गायिका सौ. समिता जोशी, ज्येष्ठ गुरु आणि गायिका सौ. विनया परब, प्रसिद्ध तबलावादक आणि गुरु हेरंब जोगळेकर, ऍड. राजशेखर मलुष्टे उपस्थित राहणार आहेत. 

या कार्यक्रमात संगीत विद्यालयातील सुमारे १७५ विद्यार्थी गायन, संवादिनी, तबला, पखवाज वादन करणार आहेत. या कार्यक्रमाला संगीत प्रेमींनी उपस्थित रहावे आणि मुलांचे कलाविष्कार पाहून त्यांना शुभाशीर्वाद द्यावेत, असे आवाहन स्वरनिनाद संगीत विद्यालयाचे विजय रानडे यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:51 26-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow