रत्नागिरी : स्टँड अप इंडिया योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

Jul 27, 2024 - 17:26
 0
रत्नागिरी : स्टँड अप इंडिया योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

रत्नागिरी : केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेत अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या घटकांकरिता मार्जिन मनी योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, कुवारबांव येथे संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे.

लाभाचे स्वरूप असे : केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया या योजनेअंतर्गत प्रकल्पमूल्याच्या ७५ टक्के बँकेकडील कर्ज मंजूर. प्रकल्पमूल्याच्या १० टक्के रक्कम अर्जदाराचा स्वहिस्सा. प्रकल्पमूल्याच्या १५ टक्के रक्कम राज्य शासनामार्फत मार्जिन मनी स्वरूपात. कर्जमर्यादा रु.१० लाख ते रु. १०० लाख आहे.

कोणताही मान्यताप्राप्त उद्योग, उत्पादन सेवा, कृषीपूरक, ट्रेडिंग इत्यादी उद्योग सुरू करण्यासाठी राष्ट्रीयीकृत बँकेने कर्ज प्रकरण मंजूर करणे आवश्यक आहे.

केंद्र शासनाने २०१५ मध्ये स्टँड अप इंडिया ही योजना घोषित केली आहे. या योजनेमध्ये १.२५ लाख अनुसूचित जातीचे उद्योजक आणि १.२५ लाख महिला उद्योजिका आगामी ३ वर्षांत निर्माण करण्याचे उद्दिष्ट केंद्र शासनाने ठरविलेले आहे. देशातील २७ सरकारी बँकांच्या १.२५ लाख शाखांच्या माध्यमातून १.२५ लाख अनुसूचित जातीचे उद्योजक आणि १.२५ लाख महिला उद्योजिका बनविण्याची जबाबदारी प्रत्येक बँकेच्या शाखेवर सोपविण्यात आली आहे.

या योजनेच्या मार्गदर्शक सूचना शासन निर्णय क्र.स्टँडई २०२०/प्र.क्र.२३/अजाक, दि. ०९ डिसेंबर २०२० अन्वये शासन स्तरावरून प्रसारित करण्यात आल्या आहेत. शासन निर्णय शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर निरीक्षणासाठी उपलब्ध आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:52 27-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow